पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरातर्फे सहस्रचंडी महायज्ञाचे आयोजन


सातारा – येथील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरात सहस्त्रचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी भव्य मंडप उभारणी तसेच महायज्ञाच्या यज्ञकुंडाचे उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि. 25 सप्टेंबर : येथील राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि.4 ऑक्टोंबर ते दि. 15 ऑक्टोबर दरम्यान सहस्त्रचंडी महायज्ञ व विविध धार्मिक कार्यक्रम तसेच समाजसेवी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
प्रथमच संपन्न होत असलेल्या या महायज्ञामध्ये सप्तशती देवी स्तुती पाठाच्या 700 श्लोकांमधून भक्तांच्या जपमाळेत आवर्तनातून प्रकटणारी दुर्गादेवीची त्रिगुण रूपे सातारकरांना अनुभवता येणार आहेत. या महायज्ञ सोहळ्यासाठी सातारा येथील सुप्रसिद्ध वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले वेदमूर्ती, ओंकारशास्त्री बोडस, दिलीपशास्त्री आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 हून अधिक ब्रह्मवृंद सहभागी होणार असून हा यज्ञ वैश्विक शांतता, बंधुभाव, हिंदू सुरक्षा आणि आगम्य अशा काही संकल्पना द्वारे आयोजित करण्यात आला आहे.

दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी सांगितले की, या यज्ञांमध्ये सातारा जिल्ह्यातील समस्त दुर्गा देवीचे भक्त सहकुटुंब सहपरिवार भक्तीभावाने सहभागी होऊ शकतात. तसेच हा यज्ञ सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणार असल्याने यामध्ये आर्थिक व वस्तुरूपात सहकार्य करून या अनोख्या अशा महायज्ञ सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन सहस्त्रचंडी महायज्ञ संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सहस्त्रचंडी महायज्ञ सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमांतर्गत 4 ऑक्टोबर, शनिवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत प्रधान संकल्प गणपती पूजन, पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध ,आचार्य वरण, प्रायश्चित्त होम, गोपूजन, स्थल शुद्धीसाठी उदकशांत, मुख्य देवता स्थापना, नवग्रह स्थापना, नवग्रह होम तसेच वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचे सहस्त्रचंडी यागाचे महत्त्व या विषयावर प्रवचन होणार आहे. सकाळी नऊ वाजता यजमानांच्या हस्ते प्रधान संकल्प सोडून यागाला सुरुवात होईल. रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सप्तशती पाठ वाचन व चंडी याग संपन्न होऊन दुपारी दोन ते पाच या वेळेत एक सहस्त्रकुमारीका पूजन म्हणजेच 1000 बालकुमारींचे पूजन करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता सप्तशती पाठाचे वाचन व चंडी याग, सायंकाळी पाच ते सात या वेळेत देवी अर्चना होणार आहे हा धार्मिक कार्यक्रम अशा पद्धतीने नऊ ऑक्टोबर गुरुवारपर्यंत संपन्न होणार असून 10 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी साडेसात ते बारा या वेळेत क्षेत्रपाल पूजन, उत्तरांग तसेच या महायज्ञाची पूर्णाहूती, कुष्मांड बली सर्वांना आशीर्वाद व हातात प्रसादाचे वितरण होणार आहे.

या महायज्ञ कालावधीमध्ये सकाळी सहा वाजता काकड आरती व सायंकाळी सात वाजता महाआरती संपन्न होणार आहे. सहस्त्रचंडी महायज्ञनिमित्त धार्मिक कार्यक्रमांंबरोबरच नजीकच्या समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे सायंकाळी सहा ते आठ या वेळेत विविध कीर्तन, प्रवचन, सत्कार संपन्न होणार आहेत. शनिवार दि,4 ऑक्टोबर ते सोमवार दि, 6 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सहा वाजता समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, सांगली यांचे सुश्राव्य प्रवचन होणार आहे. मंगळवार दि. 7 ऑक्टोबर ते गुरुवार दि. 9 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पुणे येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार समर्थ भक्त चारुदत्त बुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार व समारोपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत कर्करोग तपासणी मोफत शिबिर तसेच विविध आजारांबाबत आरोग्य महा शिबिर आयोजित आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सहस्त्रचंडी महायज्ञ यांच्या धार्मिक सोहळ्यासाठी राज्याच्या प्रमुख नेते, पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून या यज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख ,उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे, उपाध्यक्ष शिवाजी भोसले, हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत असून या महायज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर परिसरात विशेष मंडप घालण्यात आला आहे. तसेच देवी मंदिरा शेजारी सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भव्य हवन कुंडही उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.


Back to top button
Don`t copy text!