प्रभाग ३ मधून सागर सोरटे यांची प्रबळ दावेदारी; दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची शिदोरी


स्थैर्य, फलटण, दि. 11 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३ मधून सागर शांतीलाल सोरटे यांनी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली आहे. गेली २० वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या सागर सोरटे यांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क असून त्यांना युवक वर्गाचा मोठा पाठिंबा आहे. राजे गटाने नवीन आणि लोकप्रिय चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबल्यास सोरटे यांचे नाव आघाडीवर असण्याची शक्यता आहे.

सागर सोरटे हे धम्मयान चौकात राहतात आणि त्यांचा डिप्लोमा सिव्हिल इंजिनीअरिंग तसेच बी.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. ते व्यावसायिक आहेत. त्यांच्या कुटुंबात २४ सदस्य असून जवळचे नातेवाईक मिळून सुमारे ११० जणांचे भक्कम पाठबळ त्यांना आहे. याशिवाय फलटण शहरातील क्रिकेटप्रेमी आणि युवक वर्गाचा त्यांना मजबूत पाठिंबा आहे.

सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. धम्मयान युवक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २००७ साली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक महिन्याचा उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीत ते दरवर्षी सक्रिय असतात आणि २०१८ साली त्यांनी या समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.

क्रीडा क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. २०१५ साली त्यांनी श्रीमंत मालोजीराजे महाराज यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा भरवली होती. २००४ पासून ते क्रिकेटच्या माध्यमातून युवकांना व्यसनमुक्ती आणि शारीरिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. २०२२, २०२३ आणि २०२४ अशी सलग तीन वर्षे त्यांनी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करून विजय मिळवला आहे.

प्रभाग ३ च्या विकासासाठी त्यांच्याकडे स्पष्ट दृष्टीकोन आहे. प्रभागातील रस्ते, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांवर त्यांचा भर असेल. सार्वजनिक शौचालये, ओपन जिम, आणि शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. प्रभागातील परिट समाजासाठी धोबीघाट किंवा व्यवसायपूरक जागा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीत त्यांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्य केले आहे. दरवर्षी ते स्वखर्चाने वार्षिक भोजन समारंभ आयोजित करतात. अशा तळागाळात काम करणाऱ्या आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्याला राजे गट संधी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ज्या उमेदवारांना यापूर्वी संधी मिळाली आहे, त्यांना पुन्हा तिकीट न देता नवीन आणि कौटुंबिक मतदान जास्त असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा विचार राजे गट करत असल्याची चर्चा आहे. ऐनवेळी प्रकाशझोतात आलेल्या उमेदवारांपेक्षा सागर सोरटे यांच्यासारख्या सातत्याने कार्यरत असलेल्या युवा नेतृत्वाला प्राधान्य मिळाल्यास प्रभागात राजे गटाची ताकद वाढू शकते.


Back to top button
Don`t copy text!