दैनिक स्थैर्य | दि. ३ मे २०२३ | फलटण |
‘द हॉकी सातारा’ संघटनेचे हॉकी प्रशिक्षक श्री. सागर कारंडे यांची महाराष्ट्राच्या मुलींच्या सब ज्युनिअर हॉकी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली तर कु. अनुराधा ठोंबरे हिची संघामध्ये निवड करण्यात आली आहे.
हॉकी इंडियाअंतर्गत हॉकी महाराष्ट्र या संघटनेच्या मान्यतेने सातारा जिल्ह्यामध्ये द हॉकी सातारा ही संघटना कार्यरत असून या संघटनेचे हॉकी प्रशिक्षक श्री. सागर कारंडे यांची ओडिसा (राऊलकिला) येथे दि. ४ ते १४ मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तेराव्या हॉकी इंडिया सब ज्युनिअर महिला हॉकी स्पर्धा सन २०२३-२४ मध्ये भाग घेणार्या महाराष्ट्र सबज्युनिअर महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
हॉकी महाराष्ट्र संघटनेने महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मैदानावरती आयोजित केली होती. सदर निवड चाचणीमध्ये कु. अनुराधा ठोंबरे हिने अत्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्राच्या संघामध्ये आपले स्थान निश्चित केले. तसेच या संघाला प्रशिक्षक म्हणून द हॉकी साताराचे श्री. सागर कारंडे यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती द हॉकी सातारा संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे वरिष्ठ हॉकी प्रशिक्षक तसेच निवड समिती सदस्य द हॉकी साताराचे मुख्य प्रशिक्षक श्री. महेश खुटाळे सर यांनी पत्रकारांना दिली.
श्री. सागर कारंडे व कु. अनुराधा ठोंबरे यांची निवड झाल्याबद्दल तसेच त्या खेळाडूचे प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ सर व श्री. खुरंगे सर व मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य माननीय श्री. गंगावणे सर या सर्वांचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री. मनोज भोरे, सचिव श्री. मनीष आनंद, द हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा, सदस्य श्री. प्रवीण गाडे, श्री. महेंद्र जाधव, श्री. पंकज पवार यांनी खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.