स्थैर्य, औंध, दि. ७ : औंध ता. खटाव येथील सिमेंट बंधाऱ्यात दुषित पाणी राहणार नाही याबाबत कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांनी चार दिवसात कार्यवाही करावी असे लेखी पत्र उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार यांनी दिल्यानंतर गेल्या उपोषणकर्ते सागर जगदाळे यांनी सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतले.
येथील केदारेश्वर मंदीरानजीकच्या ओढ्यावरील सिमेंट बंधारा निर्लेखित करावा यासाठी सागर जगदाळे यांनी गेल्या पाच दिवसापासून मारुतीच्या मंदिरात उपोषण सुरू होते. आज प्रशासनाचे वतीने उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार, गटविकास अधिकारी रमेश काळे तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, वैद्यकीय अधिकारी डॉ अमित ठिगळे, डॉ विलास साळुंखे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन बंधारा परीसराची पाहणी केली. आणि जगदाळे यांच्याबरोबर चर्चा केली. यामध्ये कृषी विभागाने आरोग्य अधिकारी यांचेकडून आरोग्यविषयक अहवाल तसेच स्थळ फोटो घेऊन बंधारा निर्लेखित करण्यासाठी तात्काळ वरीष्ठ कार्यालयास अहवाल सादर करावा. तसेच बंधाऱ्यातील दुषित पाणी भौगोलिक परिस्थितीमुळे उपाययोजना करता येत नाहीत. बंधारा नागरी वस्तीत असल्याने लोकांच्या आरोग्याच्या हिताच्यासाठी बंधारा निर्लेखित करावा असे प्रशासनाच्या वतीने लेखीस्वरुपात पत्र दिले यावर सागर जगदाळे यांचे समाधान झाल्याने उपविभागीय अधिकारी कासार यांचे हस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले. यावेळी . सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, दत्तात्रय जगदाळे, राजेंद्र माने वसंत पवार, तानाजी इंगळे गणेश चव्हाण,संदीप इंगळे, ग्रामविकास अधिकारी चाँदशा काझी मंडल अधिकारी कुलकर्णी उत्तमराव तिकुटे, मोहन मदने, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.