दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटणकरांचे आराध्य दैवत, अवलिया सत्पुरूष सद्गुरू हरिबाबांचा अश्विन शुध्द १२ म्हणजेच गुरुवार, दि. २६ ऑटोबर २०२३ रोजी प्रकट दिन संपन्न होत आहे.
प्रकट दिनानिमित्त विजयादशमी दिवशी श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभ हस्ते सद्गुरू हरिबाबांच्या रथाचे पूजन होऊन प्रकट दिन कार्यक्रमास सुरूवात झाली. बुधवार, दि. २५ रोजी रात्री ८ वाजता कोल्हापूरच्या सुश्राव्य अशा संतकृपा सोंगी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गुरुवार, दि. २६ ऑटोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या हस्ते रथापुढे श्रीफळ वाढवून सद्गुरू हरिबाबांचा रथ फलटण नगर प्रदक्षिणेसाठी निघेल.
महतपुरा पेठ, उघडा मारूती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सद्गुरू उपळेकर महाराज मंदिर, उमाजी नाईक चौक, शिवशक्ती चौक, श्रीराम मंदिर, गजानन चौक, तेली गल्ली, मारवाड पेठ, बारस्कर चौक, शुक्रवार चौक, शंकर मार्केट, बुरुड गल्ली, पाच बत्ती चौक या मार्गाने रथयात्रा जाईल व सायं. ७ वाजता सद्गुरू हरिबाबा मंदिर येथे पोहोचल्यानंतर आरती होऊन सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
सर्व भाविक भक्तांनी रथ सोहळ्यात सहभागी होऊन सद्गुरू हरिबाबा महाराज सेवेचा लाभ घ्यावा, असे सद्गुरू हरिबाबा देवस्थान ट्रस्ट व रथोत्सव समीतीने आवाहन केले आहे.