फलटणच्या साधना घाडगे ‘आद्या पुरस्काराने’ सन्मानित; महाविकास 2026 परिषदेत राज्यस्तरीय गौरव


महाविकास 2026 राज्यस्तरीय परिषदेत फलटण तालुक्यातील साधना तुकाराम घाडगे यांना ‘आद्या पुरस्कार’. स्वयंरोजगारातून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना.

स्थैर्य, काळज, दि. १५ फेब्रुवारी : नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन (IDSA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाविकास 2026’ या राज्यस्तरीय परिषदेत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काळज येथील सौ. साधना तुकाराम घाडगे यांना ‘आद्या पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे १३ फेब्रुवारी २०२६ रोजी हा भव्य सोहळा पार पडला. महाराष्ट्र हे देशातील डायरेक्ट सेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठे मार्केट असून सुमारे दहा लाख सक्रिय विक्रेते कार्यरत आहेत. त्यापैकी तब्बल ४४ टक्के महिला असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो.

महिला आर्थिक विकास महामंडळ, सातारा संचालित ओम साई लोकसंचालित साधन केंद्र, फलटण अंतर्गत कानिफनाथ स्वयंसहायता महिला बचत गट (काळज) यांच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभारून समाजात प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल सौ. घाडगे यांची राज्यातील दहा महिलांमध्ये निवड झाली.

या वेळी अतिरिक्त मुख्य सचिव (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण) श्री. अनिल डिग्गीकर, राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे सदस्य श्री. मुकेश शर्मा, मध्य मुंबई जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती वंदना मिश्रा, ग्राहक वकील संघटनेचे सदस्य अ‍ॅड. उदय वारुंजीकर, आंतरराष्ट्रीय विपणन कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपाध्यक्ष श्री. संदीप वाही तसेच स्ट्रॅटेजी इंडियाचे मुख्य रणनीतिकार श्री. प्रांजल डॅनियल यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या यशामागे जिल्हा समन्वय अधिकारी सौ. शोभा बच्चे, विभागीय व्यवसाय सल्लागार श्री. सिद्धराम माशाळे, विभागीय सल्लागार श्री. विलास बच्चे, जिल्हा प्रकल्प सल्लागार श्री. अभिजीत काटकर तसेच ओम साई लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सौ. शीला घाडगे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.

फलटण तालुक्यातील एका ग्रामीण महिलेला राज्यस्तरीय सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हा प्रेरणादायी टप्पा ठरला आहे.


Back to top button
Don`t copy text!