
स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : फलटण येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी धडक मोर्चात माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी राज्य आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार लक्ष्य केले. यावेळी त्यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची आणि गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्याची आग्रही मागणी केली.
आपल्या मनोगताच्या सुरुवातीला सदाभाऊ खोत यांनी यावर्षी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहेत, जमिनी खचून गेल्या आहेत, जनावरे दगावली आहेत आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मुखातील वर्षाभराचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे,” असे सांगत, त्यांनी शेतकऱ्याला पुन्हा सन्मानाने उभे करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या घोषणेचे स्वागत करताना, सदाभाऊ खोत यांनी या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शेतकऱ्यांवरील बंधने उठवण्याची मागणी केली. ते म्हणाले, “शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर पहिल्यांदा शेतकरी विरोधी कायद्याच्या बेड्या तोडून टाकाव्या लागतील. स्वदेशीचा प्रसार करायचा असेल, तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ खुली करून द्यावी लागेल आणि आयातीवर लगाम घालावा लागेल.” जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करून शेतकऱ्याला आपला माल मुक्तपणे विकण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
गोवंश हत्याबंदी कायद्यावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी या कायद्यामुळे गोपालक शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, “शरद जोशी यांनी १९९५ मध्येच ‘गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे, हा गोपालक हत्याबंदी कायदा आहे’ असे म्हटले होते. आता या कायद्याचा ‘कॅन्सर’ शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून, त्याने शेतकऱ्यांचे शरीर पोखरले आहे.” दुधाळ जनावरे, जर्सी गाय, होल्स्टन गाय आणि म्हशी यांच्या व्यापारावर निर्बंध येऊ नयेत, अशी त्यांची मागणी होती. देशी गाय ही गोमाता असून तिची पूजा केली जाते, पण जर्सी गाय आणि म्हशी या शेतकऱ्यांच्या अर्थचक्राचा भाग आहेत, असे त्यांनी सांगितले.
गोशाळांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी अनेक गोशाळांनी पकडून ठेवलेली जनावरे कुठे जातात, त्यांची व्यवस्था कशी ठेवली जाते, यावर चौकशीची मागणी केली. “आमचा गोटा हीच आमची गोशाळा आहे,” असे सांगत, त्यांनी शेतकऱ्यांच्या ताब्यातून जप्त केलेली जनावरे त्यांना परत करावीत अशी भूमिका मांडली.
कार्यक्रमाच्या शेवटी, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, त्यांनी गेली ३५ वर्षे जातीय राजकारण न करता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम केले आहे. “राज्यात आजही शेतीमध्ये ५०% लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे, पण जातीच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.