“शायनिंग महाराष्ट्र” प्रदर्शनासाठी शालेय विद्यार्थ्यांना साकडे; नागरिकांचा अल्प प्रतिसाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 20 फेब्रुवारी 2024 | फलटण | अवघ्या तालुक्यात शायनिंग महाराष्ट्र या प्रदर्शनाचा बोलबाला झाला असला तरी प्रदर्शनाची हवाच निघाली असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून नागरिकांनी या प्रदर्शनाकडे पूर्ण पाठ फिरवल्याचे आयोजकांच्या लक्षात येताच आयोजकांनी आता प्रदर्शन स्थळावर येण्याचे व गर्दी करण्यासाठीचे साकडे तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना व शाळा प्रमुखांना घातल्याने प्रदर्शन स्थळावर फक्त विद्यार्थी दिसत असल्याचे आजचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजना व खात्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत दिल्लीतील सांसा फाउंडेशनच्यावतीने फलटण येथील शुभारंभ लॉन्समध्ये शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटन सोहळा सोडला तर दिवसभर प्रदर्शन स्थळावर शून्य टक्के नागरिकांच्या प्रतिसादाचे चित्र होते. आयोजकांनी याची धास्ती घेऊनच प्रदर्शन स्थळावर गर्दी करण्यासाठी स्थानिक शाळांच्या शाळा प्रमुखांना व विद्यार्थ्यांना खाजगी बसची सोय करून आमंत्रित करण्यात आले होते.

या प्रदर्शनाच्या एकूण पार्श्वभूमीवर सांसा फाउंडेशनचे प्रमुख एम.एम.भास्कर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेटून विचारले असता ते म्हणाले, या प्रदर्शनात केंद्र स्तरावरील एकूण ३५ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास, कृषी, पर्यावरण आणि जलसंवर्धन, आरोग्य आणि पोषण, संरक्षण संशोधन, लघु, सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग, भूगर्भशास्त्र आणि खाणकाम, वाणिज्य आणि व्यापार, कौशल्य आणि उद्योजक, औषध उत्पादन, पायाभूत सुविधा आणि विकास, माहिती प्रसार आणि संचार, पर्यटन आदी विषयांचा यात समावेश आहे. गतवर्षापेक्षा यावर्षी आयोजित शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनास अल्प प्रतिसाद असून सध्या शाळांचे विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देत असल्यामुळे कालच्यापेक्षा आजचे वातावरण गर्दीचे वाटत आहे.


Back to top button
Don`t copy text!