
-
प्रभाग क्रमांक १३ चे उमेदवार सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचे ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध
-
पाणी, रस्ते आणि सांडपाण्याच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्वाही
-
शहरवासीयांसाठी सिटी हॉस्पिटल, मिनी बस सेवा आणि सुसज्ज अभ्यासिकेचे आश्वासन
स्थैर्य, फलटण, दि. २८ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले प्रभाग क्रमांक १३ क मधील कृष्णा-भिमा विकास आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपल्या प्रभागासह संपूर्ण फलटण शहराच्या विकासाचा एक व्यापक आराखडा (Blue Print) मांडला आहे. “हे होणार, हे करणारच” या ठाम निर्धारासह त्यांनी आपले ‘संकल्प पत्र’ मतदारांसमोर सादर केले असून, त्यात मूलभूत सुविधांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे.
प्रभाग १३ साठी ‘स्मार्ट’ नियोजन
प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी सचिन सूर्यवंशी यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
तक्रार निवारण: प्रभागासाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र, टोल फ्री नंबर आणि टॅक्स भरण्यासाठी व तक्रारींसाठी ‘मोबाईल ॲप’ विकसित केले जाईल.
-
सुरक्षा: मुख्य रस्ते आणि चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गैरप्रकारांना आळा घालण्यात येईल.
-
पायाभूत सुविधा: प्रभागात दिवसातून दोन वेळा स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि भूमिगत विद्युत वाहिन्यांचे जाळे उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
आरोग्य आणि शिक्षणावर भर
विद्यार्थ्यांसाठी प्रभागात मोफत ग्रंथालय, वाचनालय आणि अभ्यासिका उभारली जाणार असून तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची सोय केली जाईल. तसेच, आरोग्य सुदृढ राहण्यासाठी राखीव जागेवर ‘ओपन जिम’ आणि महिलांसाठी ‘बंदिस्त व्यायामशाळा’ उभारण्याचे नियोजन आहे. संपूर्ण शहरासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून अद्ययावत ‘सिटी हॉस्पिटल’ उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
शहरासाठी मोठे प्रकल्प
केवळ प्रभागापुरते मर्यादित न राहता त्यांनी संपूर्ण शहरासाठी काही महत्त्वाच्या योजना मांडल्या आहेत:
-
मिनी बस सेवा: शहराचा विस्तार लक्षात घेऊन पीएनपी (PNP) मार्फत मिनी बस सेवा सुरू करणार.
-
कचरा व सांडपाणी: वैज्ञानिक पद्धतीने ओला व सुका कचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन.
-
सांस्कृतिक व ऐतिहासिक: शहराच्या वारशाचे जतन करण्यासाठी ऐतिहासिक केंद्र आणि सर्व सोयींनी युक्त सांस्कृतिक केंद्र उभारणार.
-
बाजारपेठ व पार्किंग: वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राखीव जागी पार्किंगची सोय आणि विविध प्रभागांत आठवडा बाजाराची सुविधा.
क्रीडा आणि मनोरंजनासाठी विशेष लक्ष
प्रभागातील नागरिकांसाठी स्विमिंग पूल, उद्याने, क्रीडांगण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘नाना-नानी पार्क’ उभारून त्यांचे सुशोभीकरण करण्याचा शब्द सचिन सूर्यवंशी यांनी दिला आहे. “जनतेचे समाधान हीच माझी सेवा आणि तोच माझा सन्मान,” या ब्रीदवाक्यासह त्यांनी मतदारांना संधी देण्याचे आवाहन केले आहे.

