
दैनिक स्थैर्य । 10 एप्रिल 2025 । फलटण । फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना या योजनेचे फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा इत्यादी अनेक लाभ दिले जातात. फलटण येथे सोमवारी श्री दत्त गार्डन कार्यालय व मयुरेश्वर मंगल कार्यालय येथे बायोमेट्रिक नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे, त्यावेळी आमदार सचिन पाटील बोलत होते.
- शैक्षणिक लाभ : नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी इयत्ता १ ते ७ साठी रु. २५००/- आणि इयत्ता ८ ते १० साठी रु. ५०००/- ची शिष्यवृत्ती.
- सामाजिक लाभ : प्रथम विवाहासाठी रु. ३०,०००/- ची आर्थिक मदत.
- आरोग्य लाभ : मोफत वैद्यकीय सुविधा व उपचार सुविधा.
आमदार सचिन पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी व विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात २० हजार कामगारांना लाभ देण्यात आला होता. आता लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

बांधकाम कामगार कल्याणकारी योजना जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व स्तरावरील लाभ प्रदान करते. या योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याचा अपेक्षित आहे. तालुक्यातील बांधकाम कामगार संघटना यासाठी मदतीला आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.