स्थैर्य, कोल्हापूर, दि.१२: अनलाॅकअंतर्गत राज्यातील मंदिरे लवकरच भाविकांसाठी खुली होण्याचे संकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीत राहूनच भक्तांना देवीचे दर्शन मिळणार आहे.
मंदिर खुले झाले तरी मंदिराच्या चारही दरवाजातून ये-जा राहणार नाही. भक्तांसाठी केवळ एकच दरवाजा खुला ठेवला जाईल. भक्तांच्या संख्येवरही मर्यादा असेल. त्यासाठी शासनाने घातलेल्या सर्व अटी-नियमांचे पालन केले जाईल. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती असेल. आत प्रवेश करणाऱ्या सर्वांची थर्मल टेस्टिंग होईल. सॅनिटायझरचा वापर केला जाईल. मंदिरात पूजेसाठी घेऊन जाणाऱ्या खण, ओटी साहित्यावरही निर्बंध असतील. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुरुवातीचे काही दिवस भक्तांना थेट गाभाऱ्यात प्रवेश न देता पितळी उंबऱ्यापासून दर्शन देण्याचाही देवस्थान समितीचा विचार सुरू आहे. देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील मंदिरे दर्शनासाठी लवकरच खुली होतील, अशी आशा सर्वसामान्य भक्ताला लागली आहे. पण, मंदिरे खुली झाली तरी भक्तांना सहज देवदर्शन होणे कठीण आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिली नाही. मात्र, मुंबईत नुकत्याच झालेल्या कोविड टास्क फोर्स बैठकीत येत्या तीन ते चार दिवसांत मर्यादित क्षमतेने मंदिर आणि रेस्टॉरंट सुरू करण्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे लवकरच भाविकांसाठी खुली होतील, असे संकेत मिळत आहेत.
नवरात्रोत्सव परंपरेनुसारच होणार
देवीचा शारदीय नवरात्रोत्सव उत्साहातच साजरा होणार आहे. नऊ दिवस देवीची विविध रूपात पूजा बांधली जाईल, नवरात्रोत्सवातील परंपरेनुसार पूजा व सर्व धार्मिक विधी होतील. पण, कोणत्याही प्रकारे मंदिरात किंवा मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची खबरदारी देवस्थान समितीकडून घेतली जाईल, असे देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. शासन आणि मंदिर व्यवस्थापनाच्या काटेकोर नियमांचे पालन करूनच देवदर्शन घ्यावे लागणार आहे. अद्याप महिन्याचा कालावधी असला तरी सहा महिन्यांनी मंदिर खुले झाल्यानंतर भक्तांसाठीची नियमावली देवस्थान समितीने तयार केली आहे.