दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । दुचाकी वितरक बोलत असल्याचे सांगत ईमेलद्वारे आरटीजीएस रिक्वेस्ट पाठवत सातारा येथील आयडीबीआय बँकेस ४ लाख ६० हजारांना गंडा घातल्याप्रकरणी एका मोबाईल क्रमांक धारकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची तक्रार बँकेच्या वतीने अजित मोहन धायगुडे (रा. अहिरे, ता. खंडाळा) यांनी नोंदवली आहे.
अजित धायगुडे हे पोवई नाका येथील आयडीबीआय बँकेत कार्यरत असून, ता. २९ रोजी दुपारी एकाने त्यांच्याशी संपर्क साधत आपण साताऱ्यातील प्रसिद्ध दुचाकी वितरक असल्याचे भासवत संभाषण केले. हे करतानाच त्या अज्ञाताने दोन आरटीजीएस पाठवायचे असल्याचे सांगितले. याच वेळी त्या अज्ञाताने दुचाकी वितरकाच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या मेलवरून आरटीजीएस करण्यासाठीची रिक्वेस्ट पाठवली. यात पंजाब नॅशनल बँकेतील मैसर रझा यांच्या खात्यात ९ लाख ९० हजार, तसेच ॲक्सिस बँकेच्या चरणजित सिंग यांच्या खात्यात ८ लाख १४ हजार पाठविण्यास सांगितले.
बँकेने त्याबाबतची खात्री करून आरटीजीएस रिक्वेस्टनुसार १८ लाख १५ हजार ६०० रुपये दोन्ही बँकेतील खात्यात वर्ग केली. दैनंदिन कामकाजादरम्यान संशय आल्याने बँकेने शहानिशा केली. या वेळी त्यांच्या संबंधित दुचाकी वितरकाने अशी कोणतीही आरटीजीएस रिक्वेस्ट पाठविल्याचे लक्षात आले. यानंतर आयडीबीआय बँकेने संबंधित बँकांशी संपर्क साधत दोन्ही बँक खात्यातील रोकड गोठविण्याच्या सूचना केल्या. रोकड गोठविण्याची प्रक्रिया होईपर्यंत संबंधितांनी त्यातील ४ लाख ६० हजारांची रोकड काढून घेतली होती. खोटी आरटीजीएस रिक्वेस्ट पाठवत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एका मोबाईल क्रमांक धारकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविण्यात आला. याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करीत आहेत.