दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा शहराच्या विकासासह सातारकरांना सक्षम पर्याय देण्यासाठी नवीन चेहरे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे . कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज निर्माण करणे हेच उद्दिष्ट असल्याची घोषणा रिपाई ( ए ) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि रिपाई सातारा शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी या पाश्र्वभूमीवर गायकवाड यांनी विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला .
गायकवाड पुढे म्हणाले, की,सातारा नगर पालिका निवडणूक रिपब्लिकन पार्टीच्या आदेशाप्रमाणे लढणार आहे. दिवंगत जिल्हाध्यक्ष आमचे प्रेरणास्थान किशोर भाऊ तपासे यांच्या काळात रिपाईची पालिकेत चांगली पकड होती . ती राजकीय ताकत निर्माण करण्यासाठी आम्ही तरूण युवा चेहरे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहोत . सातारकरांना सक्षम पर्याय आणि मूलभूत विकास कामांचा अजेंडा घेऊन निवडणुकांना सामोरे जाताना परिस्थिती सापेक्ष राजकीय आघाडी किंवा वेळ पडल्यास स्वबळावर लढाई हे सर्व पर्याय आम्हाला खुले असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले .
नवा मतदार बरोबर असल्याने ही निवडणूक फार जड जाणार नाही. तरुणांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे असेही ते म्हणाले .
महापुरुषांची विटंबना चुकीची आहे त्यामुळे विचाराने विचाराशी लढले पाहिजे. ज्यांनी हे कृत्य केले त्याचा निषेध करत आहे.
छत्रपतींची विटंबना होऊ नये याबाबत प्रशासनाने काळजी घ्यावी असे ते म्हणाले . वादग्रस्त शिल्प अनावरण प्रकरणावर मला त्याची माहिती नाही असे सांगत गायकवाड यांनी अधिक भाष्य करणे टाळले .
रिपाई पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेपूर्वी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली . यामध्ये सातारा शहराध्यक्षपदी अक्षय कांबळे याची निवड झाली . अक्षय याचा पुष्पगुच्छ देऊन अशोक गायकवाड यांनी सत्कार केला . गायकवाड यांची केंद्रीय पर्यावरण समिती सदस्यपदी निवड झाली आहे . त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू असल्याचे सूचक वक्तव्य गायकवाड यांनी केले.