सेवानिवृत्त अधिकार्‍याने फुलविली ‘गुलाब’ शेती; तरुण शेतकर्‍यांसमोर ठेवला आदर्श

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
भाडळी बु. (ता. फलटण) चे सुपुत्र आणि फलटण येथील दिवाणी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक पदावरून गतवर्षी सेवानिवृत्त झालेल्या श्री. पोपटराव भोईटे यांनी स्वत:च्या शेतामध्ये ‘गुलाब’ या ‘सोफिया’ आणि ‘टॉप सिक्रेट-डच’ जातीच्या फुलांचे उत्पादन घेऊन तरुण शेतकर्‍यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

पंचक्रोशीमध्ये असा प्रयोग भोईटे यांनी प्रथमच केला आहे. वरील दोन्ही प्रकारच्या जवळपास ५००० रोपांची लागवड करून वातावरणानुसार योग्य औषध फवारणी तसेच आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा वापर करून उत्कृष्ट उत्पादन घेतले आहे. गुलाब फुलांची योग्यवेळी तोडणी करून फलटण तसेच पुणे येथील बाजारपेठेत उत्पादीत माल पाठविला जातो. फलटणमधील पुष्पकला व्यावसायिकांकडे मोठी मागणी आहे.

याचबरोबर ‘पेरू’ या फळवर्गीय शेतीमध्ये ‘तैवान पिंक’ तसेच ‘सीताफळ’ लागवडीमध्ये ‘गोल्डन एन एम के’ या जातीच्या रोपांची लागवड करून दर्जेदार उत्पादन घेतले आहे. पेरू आणि सीताफळ उत्पादन देखील वेगवेगळ्या बाजारपेठेत पाठविले जाते. याचबरोबर उसाचेही जवळपास एकरी ८० टन उत्पादन घेतले आहे. त्यांच्याकडे असणार्‍या एक विहीर आणि एक कूपनलिकाद्वारे शेतीच्या कामी पाणीपुरवठा होतो.

यानिमित्ताने भाडळी पंचक्रोशीतील तरुण तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबविणार्‍या शेतकर्‍यांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. पाण्याचा योग्य वापर आणि योग्य व्यवस्थापन, पुरेसे भांडवल असल्यास यशस्वी शेती करता येते, असा संदेश त्यांनी दिला आहे.

भोईटे यांनी शेतीमध्ये केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतीस भेट देत आहेत. शासकीय सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर पूर्णत: निसर्गावर अवलंबून असणार्‍या शेती क्षेत्राकडे वळण्याचे धाडस सहसा कुणी करत नाही; परंतु उपलब्ध पाण्याचा ठिबक सिंचन पद्धतीने वापर करून श्री. भोईटे यांनी आलेल्या अडचणींवर मात करून यशस्वी शेतकरी होऊन पारंपरिक पद्धतीने शेती करणार्‍यांपुढे नवीन आदर्श ठेवला आहे.

शेतीच्या कामासाठी कुटुंबातील सर्व सदस्य आणि प्रामाणिक शेतमजूर यांच्यामुळे शेती यशस्वी झाल्याचे श्री. पोपटराव भोईटे यांनी शेवटी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!