स्थैर्य, सातारा, दि.१०: जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक क्रिस्टियानो रोनाल्डोने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. रोनाल्डो १०० आंतरराष्ट्रीय गोल करणारा जगातील दुसरा व युरोपमधील पहिला खेळाडू बनला. पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोने नेशन्स लीगमध्ये स्वीडनविरुद्ध २ गोल केले. त्याच्या गोलच्या मदतीने पोर्तुगालने स्वीडनला २-० ने हरवत सलग दुसरा विजय मिळवला. रोनाल्डो १०० पेक्षा अधिक गोल करणारा एकमेव सध्या खेळणारा खेळाडू आहे. ३५ वर्षीय रोनाल्डोचे १६५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १०१ गोल झाले. पोर्तुगालने सध्याचा चॅम्पियन स्वीडनला घरच्या मैदानावर हरवले. रोनाल्डोने ४५ व्या मिनिटाला फ्री-किकवर गोल करत १०० आंतरराष्ट्रीय गोलचा आकडा गाठला. त्यानंतर ७२ व्या मिनिटाला आऊटसाइड बॉक्स गोल केला. स्वीडनच्या गुस्ताव स्वेनसनला ४४ व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाले. रोनाल्डो दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. त्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाला ४-१ ने हरवले होते.
एमबापेविना खेळणाऱ्या फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 ने हरवले
जागतिक विजेता फ्रान्सने उपविजेत्या क्रोएशियाला ४-२ ने हरवले. फ्रान्स आपला स्टार स्ट्रायकर किलियन एमबापेविना खेळत हाेता. घरच्या मैदानावर फ्रान्सकडून अँटोनी ग्रीजमॅनने ४३ व्या, डायोट उपामेकानोने ६५ व्या, ऑलिव्हर गिराउडने ७७ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. क्रोएशियाच्या डोमिनिक लिवाकोचिवने ४५+१ व्या मिनिटाला आत्मघाती गोल नोंदवला. क्रोएशियाकडून डेजान लोवरेनने १६ व्या व ब्रेकालोने ५५ व्या मि. गोल केला. दुसरीकडे, बेल्जियमने आइसलँडला ५-१ ने हरवले.