दैनिक स्थैर्य । दि. २० जानेवारी २०२३ । मुंबई । कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतच कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन उद्यान’ उभे राहणार आहे. या उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून उद्यानात पोहोचणारा रस्ता सहा महिन्यांत करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन उद्यानाबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, सहसचिव भानुदास पिंगळे, मनपाचे कार्यकारी अभियंता (रस्ते) सु.बा. बाविस्कर, कार्यकारी अभियंता (विकास) रा.आ. जाधव, उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले, मानवी जीवनासाठी आणि नैसर्गिक जैवविविधता टिकून राहण्यासाठी कांदळवनाचे महत्त्व आहे. कांदळवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याची शास्त्रीय माहिती जनतेला होण्यासाठी आणि त्यांच्या मनात कांदळवन परिसंस्थेबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी मुंबईत कांदळवन उद्यान उभे राहत आहे. दहिसर आणि गोराई येथे हे उद्यान उभे राहणार आहे. त्यातील गोराई कांदळवन उद्यानाचे काम सुरू झाले आहे. दहिसर येथील कांदळवनला पोहोचणारा रस्ता तयार करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने त्वरित आराखडा तयार करावा. नियमानुसार त्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.