स्थैर्य, दि. ९: देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असतानाच रविवारी सौदी अरेबियात जगातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी ‘अरामको’वर हल्ला झाला. हौती बंडखोरांनी १४ ड्रोन व ८ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे रिफायनरीवर हल्ला केला. तथापि, क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आले. त्याचे काही तुकडे रहिवासी भागांत पडले. ‘अरामको’चे नुकसान झाले नाही. भारतीय तेल तज्ज्ञांच्या मते, त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांवर तत्काळ परिणाम होणार नाही. मात्र, हल्ल्यानंतर क्रूडचे दर वर्षाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले. सोमवारी क्रूड ऑइल १.७५ डॉलरच्या तेजीसह (+२.९%) ७१.३७ डॉलर प्रति बॅरल झाले. कोरोना काळानंतर क्रूडचा हा सर्वोच्च दर आहे. त्याआधी ८ जानेवारी २०२० ला दर ७१ डॉलरवर पोहोचला होता.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक तणावामुळे क्रूड ऑइल ७३ डॉलरपर्यंत पोहोचू शकते. ओपेक आणि मित्रराष्ट्रांनी उत्पादन न वाढवण्याची भूमिका घेतल्यामुळेही दर वाढत आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात तेलाचे भाव वाढू शकतात. भारत ८०% तेल आयात करतो. सौदी अरेबियाकडून भारत २०% तेल खरेदी करतो.
भास्कर एक्स्पर्ट : पंधरवड्याच्या उसळीमुळे दरावर परिणाम नाही
हल्ल्याचा भारतावर काय परिणाम?
रिफायनरीला नुकसान न झाल्यामुळे पुरवठा बाधित होणार नाही. भारत ७५% तेल एक महिन्याच्या सरासरी दरावर खरेदी करतो. एक-दोन आठवड्यांच्या उसळीमुळे दरावर परिणाम होत नाही.
आधी केव्हा केव्हा हल्ले झाले आणि दर वाढले?
सप्टेंबर २०१९ मध्ये हल्ल्यानंतर ‘अरामको’त उत्पादन थांबले होते. तेव्हा तेलाचे दर वाढले होते, पण एक आठवड्यात सामान्य झाले होते.
नव्या स्थितीत दर वाढतील की स्थिर राहू शकतात?
प्रत्येक रिफायनरीत १०% फ्युएल लॉस होतो. क्रूडचे दर वाढल्यास लॉस प्राइसही वाढेल. दर कमी-जास्त होण्यात लॉस अॅव्हरेजचेही महत्त्व असते. कंपन्यांच्या मार्जिनवर फरक पडला तर ग्राहकांवर बोजा येणारच. निवडणुकीमुळे कंपन्यांचे मार्जिन कमी केले तर निवडणुकीनंतर त्या लॉस अॅव्हरेज भरून काढतील. हल्ले असेच सुरू राहिले आणि रिफायनरीचे नुकसान झाले कर कच्च्या तेलाच्या दरात १४ डॉलरपर्यंत वाढ होऊ शकते.
हौतीला अमेरिकेने यादीतून काढले, अमेरिकाच सौदीला मदत करेल
बंडखोरांनी हल्ला का केला?
अमेरिकी मदत न मिळाल्याने सौदी कमकुवत झाला आहे. बायडेन यांनी हौतीला अतिरेकी यादीतून काढून टाकले होते. त्यामुळे हौती बंडखोरांचे मनोबल वाढले. त्यांना इराण मदत करत आहे. चीनचाही पाठिंबा आहे.
हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहू शकतो का?
संघर्ष प्रदीर्घ चालणार नाही. अमेरिका पुढे आला नाही तर सौदी काही करू शकणार नाही. हल्ले वाढतील. पण अरामकोवरील हल्ल्यामुळे अमेरिका गप्प बसणार नाही. त्याला मदत करावीच लागेल.
तज्ज्ञ : सेवानिवृत्त मेजर जनरल पी. के. चक्रवर्ती; प्रशांत वशिष्ठ, उपाध्यक्ष, रेटिंग कंपनी इकरा