स्थैर्य, सातारा, दि.१६: ज्येष्ठ संपादक गिरिश कुबेर यांच्या रेनिसाँस स्टेट या पुस्तकात छत्रपती शिवरायांसह त्यांच्या सर्व वंशजाबद्दल आक्षेपार्ह व चुकीचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. कुबेरांचे हे पुस्तक म्हणजे पुरंदरेंचा इंग्रजी अवतार असून या पुस्तकांवर राज्यशासनाने तत्काळ बंदी घालावी व कुबेरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी इतिहास संशोधक व वक्ते डॉ श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली .
कोकाटे म्हणाले, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवराय यांचे गुरू नव्हते, हे शासन नियुक्त वसंत पुरके समितीने सिद्ध केले आहे. हा वैचारिक वाद महाराष्ट्रात सात वर्ष सुरू होता. याची गिरिश कुबेरांना अजिबात कल्पना नव्हती, असे शक्य नाही. संशोधनाअंती राज्य सरकारने दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवून त्यांच्या नावाचा क्रीडा पुरस्कार रद्द केला. तरीसुध्दा रेनिसान्स स्टेट या पुस्तकात कुबेर ओढूनताडून कोंडदेवांचा जन्म शिवरायांशी जोडतात, हा कुबेरांचा उद्धटपणा आणि विकृती आहे. कुबेरांची मांडणी छत्रपती शिवराय-राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणारी आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून सनातनी व्यवस्थेला देणे हा कुबेरांचा उद्देश आहे. संशोधनाचे कोणतेही नियम न पाळता लेखणी उचलून खरडपट्टी करण्याची कुबेरांची पद्धत आहे. कुबेरांचे हे पुस्तक पुरंधरेचा इंग्रजी अवतार असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू यांच्या बाबतही कुबेर यांनी आक्षेपार्ह मांडणी करून अनैतिहासिक मजकूर प्रसिद्ध केला असून कुबेरांची ही मांडणी संघी विकृतीने भरली असल्याची टीका कोकाटे यांनी केली.
जे कुबेर संत रामदास, टिळक, सावरकर, टिळक, हेडगेवार, गोळवलकर यांचे विस्ताराने कौतुक करतात ते चक्रधर बसवेश्वर, संत तुकाराम महाराज महर्षी वि. रा. शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव भोसले, अण्णाभाऊ साठे यांचा साधा उल्लेखपण करत नाहीत. महाराष्ट्राच्या पुनर्जागरामध्ये यांचा काही वाटा नाही, असे कुबेरांना वाटते काय? असा सवाल कोकाटे यांनी केला.
हे पुस्तक सनातनी विचारांचे चोपडे जातीयवादाने भरले आहे. कुबेरांमध्ये सुसंस्कृतपणा शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून मागे घ्यावे. महाविकास आघाडी सरकारने या पुस्तकावर बंदी घालून कुबेर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली. या पुस्तकाच्या संदर्भात आपण स्वतः खासदार उदयनराजे भोसले यांना भेटणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.