दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘आपल्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग आहे. या वर्गाने आज श्रीराम कारखान्याची अवस्था काय आहे?, सहकारी दूध संघाची अवस्था काय आहे?, तालुक्यातल्या एमआयडीसीला कुणी विरोध केलाय? 30 वर्षात त्या लोकांनी काही केलं नाही ते लोक पुढच्या 5 वर्षात काय करणार आहेत? याचा विचार करुन आपला स्वाभिमान जागवून येत्या निवडणूकीत परितर्वन घडवलं पाहिजे या विचाराने सिचन पाटील यांना विजयी करा.’’, असे विधान सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केले.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ विडणी (ता.फलटण) येथे आयोजित जाहीर सभेत श्रीमंत शिवरुपराजे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आदींची उपस्थिती होती.
‘‘श्रीराम कारखान्याची एकहाती सत्ता आपण त्यांच्याकडे दिली आहे. पण त्यांनी 500 रुपये कमी भाव दिला, कारखान्याची मालकी दुसर्याला दिली. कारखाना चालवायला देताना भाडं वाढवायचं सोडून त्यांनी कमी केलंय. सभासदांनी याचा विचार करण गरजेचं अहे. दूध संघाचाही असाच प्रश्न आहे. सहकारी दूध संघाच्या जमिनीचा लिलाव त्यांनी केला. या दूध संघाचं दूध संकलन लाखो लिटर होतं ते कमी झालं आणि ‘गोविंद’चं संकलन वाढवलं. याचा विचार शेतकर्यांनी केला पाहिजे’’, असेही श्रीमंत शिवरुपराजे यांनी स्पष्ट केले.
‘‘अजितदादांनी निधी दिला म्हणून गावोगावी विकासकामांचा नारळ त्यांना फोडता आला. त्याच अजितदादांच्या विरोधात आज त्यांनी भूमिका घेतली आहे. महायुती सरकारने केंद्राच्या मदतीने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्या आपल्याला पुढे सुरु ठेवायच्या आहेत. महायुती सरकारनी तुम्हाला काय दिलं आणि पूर्वीच्या सरकारनी काय दिलं याची तुलना करुन मतदान करा आणि सचिन पाटील यांना मतदान करुन तालुक्यात बदल घडवा’’, असे आवाहनही श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी यावेळी केले.