नद्या पुनरुज्जीवित केल्यास पाण्याची वणवण थांबेल – डॉ. जी. बी. देगलूरकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२२ । मुंबई । पाच हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या शोध मोहिमेला जगदीश गांधी यांनी वैज्ञानिक दृष्टी दिली व अखंड परिश्रमातून सरस्वती नदीचे पंचवीस किलोमीटर पात्र पुनरुज्जीवित केले. अशाप्रकारचे काम भारतातील इतर नद्यांमध्ये केल्यास आपल्या देशाची पाण्याची वणवण संपेल असा विश्वास वास्तु-शिल्प शास्त्राचे जेष्ठ अभ्यासक प्राचार्य डॉ. जी. बी. देगलूरकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेचा दहावा जलमित्र पुरस्कार मुंबई येथील श्री सरस्वती हेरिटेज संस्थेचे चेअरमन व जेष्ठ नदी अभ्यासक जगदीशभाई गांधी यांना डेक्कन कॉलेज आणि अभिमत विद्यापीठाचे माजी प्राचार्य डॉ. जी. बी. देगलूरकर यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी डॉ. विजय परांजपे व वनराईचे रविंद्र धारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य देगलूरकर म्हणाले की, सरस्वती नदी लुप्त झाल्याच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. यापूर्वी डॉ. वाकणकर, डॉ. परचुरे आदी अनेकांनी सरस्वती नदीचे शोधकार्य हाती घेतले होते. त्यानंतर जगदीश गांधी यांनी या शोधकार्याला वैज्ञानिक दृष्टी दिली. ‘इस्रो’ सारख्या संस्थांची मदत घेऊन भूगर्भीय संशोधनातून सरस्वतीचा मूळ वहनमार्ग शोधला व त्यामार्गावरील भूमिगत तलावांचे रेखांकनही केले. तसेच खंबातच्या आखाताजवळील नदीचे पंचवीस किलोमीटर पात्र पुरुज्जीवीत केल्यामुळे हजारो हेक्टर जमीन सुपीक झाली. जगदीश गांधी यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. एक व्यक्ती एवढे मोठे काम करु शकते हा आदर्श घेऊन प्रत्येकाने कार्यरत होण्याची आवश्यकता आहे. आपला उद्धार आपणच केला पाहिजे, सरकार किंवा इतर कोणी तो करेल अशी वाट बघण्यात अर्थ नाही. आपली संस्कृती ‘सिंधू’ संस्कृती नसून सरस्वती संस्कृती ही मूळ संस्कृती असून तीच खरी भारताची ओळख आहे. सरस्वती संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती असल्याचे सांगून डॉ. देगलूरकर यांनी सरस्वती नदीच्या काठावरील चौदाशे प्राचीन स्थाने व अनेक ऐतिहासिक मानवी स्थळांची माहिती यावेळी दिली. सरस्वती नदीचे प्राचीन महत्व देगलूरकर यांनी विशद केले.

यावेळी डॉ. विजय परांजपे म्हणाले की, कोणत्याही कामात नैसर्गिक आणि कृत्रिम अडचणी येतात. पण सुंदर कामाची केवळ प्रशंसा न करता येणाऱ्या बदलांचा विचार करून आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. हवामान बदल हा अपरिहार्य आहे त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. पुढील काही वर्षांत पाणी वाढत जाणार आहे, कारण हिमालयातील हिमनग वितळणार आहेत. त्यामुळे सरस्वतीच्या पुनर्जीवनाला त्याचा मोठा फायदा होईल. परंतू हिमनग वितळत गेल्यामुळे पंचवीस-तीस वर्षानंतर पुन्हा पाणी कमी होईल हा धोकाही लक्षात घेतला पाहिजे. पाण्याचा वापर कसा करावा याबाबत समाजाला सखोल मार्गदर्शन झाले तर योग्य परिवर्तन होईल असेही डॉ. विजय परांजपे यांनी सांगितले. यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनीही मनोगत व्यक्त केली.

जलमित्र पुरस्काराने मी धन्य झालो असून मला सन्मानीत केल्याबद्दल महाराष्ट्र विकास केंद्राचा सदैव ऋणी राहीन, असे सांगून जगदीशभाई गांधी यांनी सरस्वती नदीच्या शोध कार्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी गांधी यांनी सॅटेलाईटव्दारे घेतलेल्या छायाचित्रांसह सरस्वतीच्या उगमापासून खंबातच्या आखातापर्यंतचा तीचा प्रवास दाखवणारी स्वतः तयार केलेली चित्रफीत उपस्थितांना दाखवली.

महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी प्रास्ताविक व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी जगदीशभाई गांधी यांना सरस्वती पुत्र ही उपाधी देत जगदीश भाई गांधी यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.

यावेळी संस्थेला गेली दहा वर्ष सहकार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. खुमासदार शैलीने प्रा. प्रदीप कदम यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले तर सुनील जोशी यांनी आभार मानले.

या प्रसंगी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अनुक्रमे डॅा.दि.मा.मोरे व श्री.अविनाश सुर्वे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक श्री.प्रफुलचंद्र झपके, डॉ. प्रतीक पाटील, जलसंवादचे संपादक डॉ.दत्ता देशकर, डॉ.सतीश खाडे, महाराष्ट्र जलसंपत्ती विनिमय प्राधिकरणाचे माजी सदस्य डॅा.सुरेश कुलकर्णी, मेजर बी.जी. पाचर्णे, पर्यावरण तज्ञ डॅा.सचिन पुणेकर, राजेंद्र माहुलकर, प्रा.डॅा.पी.डी. साबळे, राजेंद्र घावटे, राजाभाऊ गोलांडे, रावसाहेब बढे, राजेंद्र कुंभार, मुकुंदराव शिंदे, निंबाळकर साहेब, व्ही.एन. शिंदे, चंद्रकांत शेलार, साहेबराव लेंडवे, प्राचार्य सदाशिव कांबळे, झुंजारराव भांगे, संजय देवकुळे, अमित वाडेकर आदी मान्यवर व जलक्षेत्रातील तज्ञ, अभ्यासक, मार्गदर्शक, जलप्रेमी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!