स्थैर्य, सातारा, दि.१८: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यावर उपाय म्हणून शासनाने लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम अत्यंत प्रभावीपणे सुरू असून लसीचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी दिली.
डॉ. कदम यांनी गुरुवारी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाला भेट देऊन येथील लसीकरणाचा तसेच इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी रुग्णालयातील अधिकारी तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी देखील संवाद साधला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, मा. नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, नगरसेवक किशोर शिंदे, माजी नगरसेवक कल्याण राक्षे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ. अठले, डाॕ दिपक थोरात आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात एक लाख सहा हजार नागरिकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. दिवसाला सरासरी सात हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध केली असून, पालिकेच्या कस्तुरबा व गोडोली येथील रुग्णालयातही लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे या मोहिमेत कोणताही अडथळा आलेला नाही. सध्या कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड लसीचा पर्याप्त साठा आरोग्य विभागाकडे आहे. लसीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड व्यक्तींनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी केले. डॉ. सुभाष चव्हाण, मा. नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी कस्तुरबा रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केले.