दैनिक स्थैर्य | दि. ३ जून २०२३ | पुणे|
पुण्यातील सिंचन भवन येथे माढा लोकसभा मतदारसंघातील व सहा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित तथा कामे सुरू होण्याच्या स्थितीत असणार्या सर्व जलसिंचन प्रकल्पांबाबत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीवरून आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खा. रणजितसिंह यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील तीस जलसिंचन प्रकल्पांच्या कामांची सूची अजेंड्यावर घेतली होती. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांच्या विषयांवर त्या त्या लोकप्रतिनिधींनी आपापली बाजू मांडत ते प्रकल्प लवकरात लवकर कसे पूर्ण होतील, त्यासाठी करावी लागणारी कार्यवाही व तरतुदी याविषयी सूचना मांडल्या. यावर संबंधित अधिकार्यांनी त्या प्रकल्पाची सद्य:स्थिती, शासकीय मान्यता, तरतुदींविषयी माहिती दिली व हे प्रकल्प लवकरात लवकर कसे मार्गी लागतील, या करीता कराव्या लागणार्या पुढील शासकीय कार्यवाहीची जबाबदारी कार्यकारी संचालक यांनी घेतली.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीस निमंत्रित विधानसभा सदस्य आ. जयकुमार गोरे, आ. शहाजीबापू पाटील, आ. संजयमामा शिंदे, आ. दीपक चव्हाण, भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, के.के. पाटील, बाळासाहेब सरगर, सोपानकाका नारनवर, दत्तात्रय मोरे या मान्यवरांसह महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता तसेच विविध प्रकल्पांचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
या बैठकीत पुढील जलसिंचन योजनांचा आढावा घेण्यात आला.
गेली तीन वर्षे सातत्याने खा. रणजितसिंह पाठपुरावा करत असलेल्या निरा-देवघरच्या लाभक्षेत्रातील वितरण नलिकेच्या किमी ६५ ते किमी ८७ पर्यंतच्या कामाच्या निविदा येत्या १५ दिवसात प्रसिद्ध होऊन त्या कामाला लवकरच सुरू होईल. निरा-देवघरच्या ५०० कोटींच्या कामांना पुढील एक महिन्यात सुरुवात होत आहे. यामध्ये माळशिरसपर्यंतचे पाणी वितरण नलिकेचे काम पूर्ण होणार आहे. याबरोबरच माळशिरस तालुक्यातील लाभक्षेत्रापासून वंचित असलेल्या १२ गावांचा समावेशही लवकरच होणार आहे. नव्याने लाभक्षेत्रात समावेश झालेल्या पंढरपूर व सांगोला तालुक्याच्या पाणी वाटपाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण तालुक्यातील बंधारे, पाझर तलाव भरून तालुक्यास अपेक्षित असणारे पाणी देऊन मगच पाणी खाली इतर तालुक्यांना देण्यात यावे, अशी सूचना मांडली. यावर तालुक्याचे हक्काचे पाणी तालुक्यास मिळणारच आहे, याव्यतिरिक्त अतिरिक्त पाण्यातूनही ०.९३ टीएमसी पाणी धोम-बलकवडीतून फलटण तालुक्यास मिळणार असल्याची अधिकृत माहिती अधिकार्यांनी दिली.
सोळशी व शिवथरघळ येथून निरा-देवघर धरणात तथा माण, फलटण, सांगोला या तालुक्यांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबत झालेला ड्रोन सर्वे याबाबत प्रशासकीय अहवाल तथा अभिप्राय लवकरात लवकर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
धोम-बलकवडी व निरा-देवघर कालवा जोड प्रकल्पाच्या निविदा पुढील पंधरा दिवसात पूर्ण होऊन उतरोली (ता. भोर) येथे सदर प्रकल्पाच्या कामाची सुरुवात लवकरच होईल. या आशिया खंडातील पहिल्याच कालवा जोड प्रकल्पामुळे धोम-बलकवडी कालव्याचे पाणी चारमाहीचे आठमाही होणार आहे. निरा देवघरचे बंदीस्त पाईप, बाष्पीभवन व इतर बाबीतून बचत होणार्या ४.१० टीएमसी अतिरिक्त पाण्यामधून ०.९३ टीएमसी पाणी धोम-बलकवडी कालव्यातून लाभक्षेत्रात मिळणार आहे. याबरोबरच या लाभक्षेत्रात कारूंडे व कोथळे या गावांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या व धोम-बलकवडी कालव्याची उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
जिहे-कटापूर योजनेच्या सुरू असलेल्या कामाबाबत आ. जयकुमार गोरे यांनी आढावा घेत असतानाच लाभक्षेत्रातील पाणी वाटपाचे फेर नियोजन करून ४६ गावांचा समावेश त्यामध्ये करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या टप्प्यावर आहे, त्याबाबत माहिती घेतली. तसेच उरमोडी – कोंबडवाडी बंदीस्त वितरण नलिकेचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकामी कराव्या लागणार्या कार्यवाहीच्या सूचनाही देण्यात आल्या. खा. निंबाळकरांनी या सूचनांस अनुमोदन दिले.
सांगोला उपसा सिंचन योजनेचे काम लवकरच सुरू होत असून त्याबाबत आ. शहाजीबापू पाटील व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आढावा घेत, टेंभू प्रकल्पातून मिळणार्या अतिरिक्त २ टीएमसी पाण्याच्या नियोजनाबाबत सूचना केल्या व त्यातील ०.६ टीएमसी पाणी वर्षातून दोनवेळा माण नदीत सोडून तालुक्यातील बंधारे भरून घेण्यात यावेत व कोरडा आणि अप्रूका नदीत पाणी सोडण्यात येऊन बंधारे भरून देण्याबाबत नियोजन करण्यास सांगितले. तसेच तिसंगी, सोनके, बुद्देहाळ, चिंचोली तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याकामी नियोजन करण्यात यावे व माण नदीवर पाच नवीन बॅरेज बांधण्याकामी प्रस्ताव शासन स्तरावर मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. याबरोबरच सांगोला तालुक्यातील सिंचनापासून वंचित असणार्या गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासन मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या.
माढा तालुक्यातील तुळशी बावी व मानेगाव खैराव योजनेस तत्वत: मान्यता मिळाल्यानंतर केलेल्या पुढील कार्यवाहीचा आढावा खा. निंबाळकर यांनी घेतला व शासन स्तरावर लवकरच मान्यता मिळून पुढील तीन वर्षात या योजनेची कामे पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला.
करमाळा तालुक्यातील मांगेवाडी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पात करण्यात यावा. तसा प्रस्ताव लवकरात लवकर शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, याबरोबरच रिटेवाडीतून उजनी व उजनीतून पोंदवडीत घेऊन पश्चिम करमाळ्यातील कायम दुष्काळी भागास देण्यात यावे व गोदावरी मराठवाडा प्रकल्पातील जेऊर बोगद्यातील अर्धा टीएमसी पाणी उपसा सिंचन पद्धतीने जवळच्या वंचित भागांना मिळणेबाबतचा प्रस्ताव शासन मंजुरीस पाठविण्यात यावा, अशा सूचना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. संजयमामा शिंदे यांनी मांडल्या. याबरोबरच वसना-वांगना प्रकल्पातून उत्तर कोरेगाव तालुक्यातील गावांना लाभ मिळण्याबाबतच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला.
या सर्व प्रकल्पांच्या शासन मान्यतेसाठी व मंजुरी मिळालेल्या कामांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानून उर्वरित प्रकल्पांना शासन मान्यता मिळणेबाबत लवकरच आज उपस्थित असणारे शिष्टमंडळ घेऊन मंत्रालयात बैठक लावणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच कृष्णा-भीमा स्थैर्यीकरण व इतर छोट्या-मोठ्या प्रकल्पांची कामे आगामी तीन वर्षात मार्गी लागतील, अशी खात्री त्यांनी यावेळी दिली.