

स्थैर्य, सोलापूर, दि. 27 : जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येत आहे. निवृत्तीवेतनधारकांनी आपली माहिती 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोषागार कार्यालयाला पाठविण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रूपाली कोळी यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी पूर्ण नाव, पत्ता, पीपीओ क्रमांक, पॅनकार्ड, भ्रमणध्वनी/दूरध्वनी क्रमांक, असल्यास ईमेल आयडी आणि आधार क्रमांक याची माहिती देणे आवश्यक आहे. तालुक्यातील निवृत्तीवेतनधारकांनी आपली माहिती उपकोषागार कार्यालयात तर शहरातील निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावी. ही माहिती solapur.pension@gmail.com या ईमेलवर किंवा जिल्हा कोषागार कार्यालय, निवृत्तीवेतन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सोलापूर-413001 या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन श्रीमती कोळी यांनी केले आहे.
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गणनेमध्ये बदल केले असून नवीन कर आकारणी प्रक्रिया आणि जुनी कर आकारणी प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानुसार निवृत्तीवेतनधारकांनी आपल्याला हवी असलेली कर आकारणी प्रक्रिया निवडून जिल्हा कोषागार कार्यालयाला to.solapur@zillamahakosh.in या ईमेलवर आपले नाव, पीपीओ नंबर, शाखेबाबत 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत कळविण्याचे आवाहन श्रीमती कोळी यांनी केले आहे.

