स्थैर्य, मुंबई, दि.१३: मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक होते. त्याच्यावर झालेला हल्ला शिवसैनिकांनी दिलेली प्रतिक्रिया होती. राऊत यांनी ट्विट केले की, “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील हेच धोरण आहे.”
दुसरीकडे 65 वर्षीय मदन शर्मा म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर कायदाव्यवस्था सांभाळू शकत नाहीत तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. कोणते सरकार येऊन कायदा व सुव्यवस्था हाताळेल हे जनतेला ठरवू द्यावे.”
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्याची केला निषेध
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही नौदल अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी ट्विट केले की, “मुंबईतील गुंडांच्या हल्ल्याचे शिकार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांची प्रकृती जाणून घेतली. मी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. माजी सैनिकांवर होणारे अशाप्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाहीत.”
काय आहे प्रकरण?
शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांनी आपल्या 5-6 कार्यकर्त्यांसोबत मिळून एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला त्यांच्या घरात घुसून मारहाण केली होती. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी 6 शिवसैनिकांना अटक केली होती. मात्र 12 तासांतच त्यांना जामिनावर सोडले. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम आणि पदाधिकारी संजय मांजरे देखील सहभागी आहेत.