दैनिक स्थैर्य | दि. १३ सप्टेंबर २०२४ | फलटण | सातारा जिल्हयात दि. ०७ सप्टेंबर ते दि. १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. त्या दरम्यान सातारा जिल्हयात अनंत चतुदर्शी दरम्यान गणेश मुर्तीचे विसर्जन होते व सदर विसर्जन मिरवणूक प्रसंगी विविध गणेश मंडळे प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सदर प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून सदर वाहन मिरवणूकीमध्ये जावू शकते व त्यामुळे अनुचीत प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटचे प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहानमुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांचे डोळ्यास इजा होवून त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्हयातील गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. सातारा जिल्हयामध्ये प्लाझमा, बीग लाईट आणि लेझर बीम लाईटचा वापर करू नये याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आली असल्याची माहिती फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.