स्थैर्य, नागपूर , दि.२०: नागपूर महानगर परिसरात वाढत असलेली रुग्ण संख्या बघता 15 ते 21 मार्चपर्यंत असणारे कडक निर्बंध आता 31 पर्यंत काही अंशात्मक शिथिलीकरणासह सुरू राहणार आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, व्यापारी-उद्योजक-दुकानदार संघटना, माध्यम प्रतिनिधीशी ऑनलाईन चर्चा केल्यानंतर ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 31 पर्यंत नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
बैठकीला महसूल व आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, प्रवीण दटके, अभिजित वंजारी, कृष्णा खोपडे, मोहन मते, राजू पारवे, आदी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिकेचे अपर आयुक्त जलज शर्मा, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल तसेच पोलीस, महसूल, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, दूरदृश्य प्रणाली व प्रत्यक्ष उपस्थित होते.
नागपूर शहरात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाबाबतच्या सूचना दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व व्यापारी प्रतिष्ठान, उद्योजक, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विविध संघटनेचे प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधी व संपादक यांच्याकडून आमंत्रित करण्यात आल्या. कोरोनासंदर्भातील राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत उपयुक्त सूचना विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या.
नितीन गडकरी यांनी केंद्र शासनामार्फत कोणतीही मदत लागली तर ती विनाविलंब केल्या जाईल. पालकमंत्री यांच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा व सर्व पक्षाचे नेते उभे आहेत यासोबतच जिल्ह्यातील धर्मदाय संस्था व स्वयंसेवी संस्था यांनी देखील लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्याचे आवाहन केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ग्रामीण भागांमध्ये कोरोना चाचणीचे केंद्र तातडीने वाढविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी नागरिकांवर सक्ती करण्यासोबतच त्यांना आवश्यक कामांसाठी कारण विचारुन परवानगी देण्याबाबतही निर्देशित केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेयो व मेडिकल येथील सद्य:स्थितीचा आढावा घेतला गरीब रुग्णांसाठी आजही शासकीय रुग्णालय महत्त्वपूर्ण असून या ठिकाणी बेडची उपलब्धता व आवश्यक सोयी परिपूर्ण राहतील याची खातरजमा करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी ग्रामीण भागातील उपकेंद्रांमध्ये देखील लसीकरण सुरू करण्याबाबत विनंती केली. त्याची संख्या दीडशेपर्यंत वाढविण्यात यावी.
नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी लसीकरण मोहीम एखाद्या सार्वजनिक मोहिमे प्रमाणे सुरू ठेवावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने त्याचा लाभ व्हावा अशी मागणी केली.
खासदार कृपाल तुमाने यांनी ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून आवश्यक आरोग्य सेवा व लसीकरणाला केंद्र उपलब्ध करण्याची मागणी केली.
या शिवाय बैठकीमध्ये उपस्थित असणारे आमदार व ऑनलाइन या बैठकीत सहभागी झालेले लोकप्रतिनिधी यांनी प्रामुख्याने पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ट्रांजिस्ट कॅम्प उघडणे खाजगी हॉस्पिटल मधील बिलांवर नियंत्रण ठेवणे मंगल कार्यालय मालकांना न झालेल्या समारंभाचे पैसे परत करण्याचे निर्देश देणे शाळा कॉलेजच्या बसेसचा लसीकरणासाठी उपयोग करणे पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरणार नाही यासंदर्भात कठोर कारवाई करणे, एमपीएससी व अन्य परीक्षा सुरु असल्यामुळे अभ्यासिका सुरू ठेवाव्यात, लस देताना काही खासगी हॉस्पिटलमध्ये त्याचे प्रमाण योग्य नसल्याचे निर्देशास आले आहे अशा डॉक्टरांवर कारवाई करावी, कोरोनायोद्धा, आरोग्य कर्मचारी याप्रमाणेच बँकर्स देखील लसीकरणासाठी पात्र ठरावेत, कॉरन्टाईन स्टॅम्प मिटवणाऱ्यांवर कारवाई करणे आदी मागण्याही करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित अधिकारी, मेयो व मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील या बैठकीत आरोग्य यंत्रणा उपाय योजना व आवश्यकता याबाबत आपली मते मांडली.
नागपूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वानुमते या बैठकीत 15 ते 21 पर्यंतचे कडक निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय झाला. तथापि काही शिथीलता जाहीर करून अर्थचक्रावर या निर्बंधामुळे बाधा येणार नाही. जनतेच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल, असे निर्णय बैठकीत घेतले गेले.
यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात 6 लक्ष 87 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी युद्धस्तरावर लसीकरण मोहीम राबवण्यात येईल. यासाठी 40 हजार प्रती दिवस लक्ष्य निर्धारित केले आहे. शहरात व ग्रामीणमध्ये केंद्राची लक्षनीय वाढ करण्यात येईल. यासाठी सर्व लोकप्रतिनिधीचा तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या विषाणूमध्ये काही बदल झाला काय हे तपासण्यासाठी बाधित रुग्णांचे नमुने नवी दिल्ली येथील एनसीडीसी संस्थेकडे पाठवण्यात आले आहे. नमुन्याचा अहवाल प्राप्त होताच विषाणूच्या बदलाविषयी माहिती मिळेल. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सहकार्य घेतेले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
31 मार्चपर्यंतच्या कडक निर्बंधात जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करुन दिल्या जातील, असे नियोजन केले आहे. भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंची दुकाने पूर्वी एकपर्यंत सुरू होती. आता 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री सायंकाळी सातपर्यंत सुरु राहतील तर ऑनलाईन सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहतील.
रस्त्यावरील गर्दी, अनावश्यक फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे पोलीस विभागाला सक्त निर्देश दिले आहेत. पोलिसांनीही योद्धा म्हणून जबाबदारी सांभाळावी.
31 मार्चपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये शाळा-महाविद्यालय बंद राहतील. मात्र, केंद्र व राज्यस्तरावरील पूर्व नियोजित परीक्षा कोविड प्रोटोकॉल पाळत घेण्यात येणार आहेत.
शहरात 3 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून पॉझिटिव्ह रुग्ण फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
शिथिलतेबाबत महानगर पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना प्रसारित करतील.
जनतेने स्वयंशिस्त पाळावी. ‘मी जबाबदार’ म्हणून पुढे यावे. परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाऊन हा उपाय नाही. निर्बंध लागू केले आहे, त्याला सहकार्य करावे. असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी आवाहन केले.