स्थैर्य, वाई, दि.१२: करोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वाई शहरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या अटी व नियम शिथिल करण्याबाबत आमदार मकरंद पाटील यांच्या मध्यस्थीनंतर संपूर्ण शहाराऐवजी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी सायंकाळी आदेश जारी केला.
यावेळी यशवंतनगर, पाचवड, भुईंज आणि लोणंद येथीलही प्रतिबंधित क्षेत्र शिथिल करावे अशा सूचना आमदार पाटील यांनी प्रशासनास दिल्या. यापूर्वीच महाबळेश्वर,पाचगणी व शिरवळ येथील निर्बंध शिथील केले आहेत.
येथील विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस प्रांताधिकारी संगीता राजापूरकर – चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पालिका मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ उपस्थित होत्या. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर २७ एप्रिल पासून संपूर्ण वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व, दुकाने, आस्थापना बंद आहेत. शहरातील सर्व व्यवहार ठप्प असल्याने छोट्या – मोठ्या व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील करोना बाधितांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रातील अटी व नियम शिथिल कराव्यात अशी मागणी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी केली. टाळेबंदीच्या काळात सर्व व्यवहार बंद असताना करोना रुग्ण आणि बाधितांची संख्या वाढत आहे. यांचाच अर्थ प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन अजूनही नागरिक करीत नाहीत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राचा निर्बंध उठविल्यानंतर संसर्ग वाढल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक प्रशासनाने उपस्थित केला. त्यावर करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी व्यवसाय करताना शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे, मुखपट्टीचा वापर व सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोर पालन करण्याची, सर्व व्यापारी, कर्मचारी यांची करोना चाचणी करण्याची ग्वाही व्यापारी प्रतिनिधींनी दिली. यावेळी सचिन फरांदे, अशोक लोखंडे, हेमंत येवले, अजित वनारसे, भवरलाल ओसवाल, उमेश शहा यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. यावेळी व्यापारी व काही पालिका पदाधिकारी उपस्थित होते.