स्थैर्य, सातारा, दि.१४:छत्रपती शिवाजीमहाराजांचे नातू व संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीचे मंगळवार (दि१५) रोजी लोकार्पण होत आहे.
कृष्णा वेण्णा नदीच्या संगमावर संगम माहुली येथील राज घाटावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.या शाहू महाराजांचे कार्य मोठे होते.सातारा शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा हे शहर साक्षिदार आहे. छत्रपतींच्या चौथी पिढी पिढीतील असलेले शाहू महाराजांनी सातारा शहर उदयास आणले. त्यांचे समाधीस्थळ जीर्णावस्थेत होते याची खंत साताऱ्यातील अनेक शिवप्रेमींना होती. यामुळे शिवाजी महाराजां वंशज कल्पनाराजे भोसले यांच्या सहभाग व मार्गदर्शनाखाली शिवप्रेमींनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक समाधीचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. ऑक्टोबर २०१८ मध्ये लोकसहभागातून करण्याचे ठरवून काम हाती घेण्यात आले. अवघ्या पंचवीस महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले आहे. शाहू महाराजांचे १५ डिसेंबर १७४९ रोजी सातारा शहरातील रंग महाल राजवाडा येथे निधन झाले. कृष्णा नदीच्या काठावर संगम माहुली येथील राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवार दि१५डिसेंबर शाहू महाराज (थोरले) यांची २७० वी पुण्यतिथी असून यानिमित्ताने सकाळी दहा वाजता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते समाधीचे लोकार्पण होणार आहे .आज कल्पनाराजे भोसले यांनी या कामाची पाहणी केली व काही सूचना केल्या. यावेळी अजय जाधवराव, राजू राजपुरोहित,शशिकांत पवार,रोहित सावंत,विनीत पाटील,पंकज चव्हाण उपस्थित होते.याच परिसरात महाराणी ताराराणी, येसूबाई यांच्याही समाधी आहेत. या समाधिंचाही लवकरच जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. ४२ वर्षे राज्य करणाऱ्या शाहू महाराजांची नोंद घेण्यासाठी सारखी एकही वास्तू शहरात नव्हती. या वास्तूचा जीर्णोद्धार झाल्यामुळे या समाधीकडे पाहिल्यानंतर नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.