बचतगटाच्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प – केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह


दैनिक स्थैर्य । दि. ०९ मार्च २०२२ । ठाणे । ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांना लखपती करण्याचा संकल्प केला असून यासाठी जिल्हा प्रशासनाने  सर्वतोपरी सहकार्य करावे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास व  पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) महिलांची एकदिवसीय कार्यशाळा,  ठाणे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील होते.  यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील, माजी उपाध्यक्ष दशरथ टीवरे, माजी सभापती संजय निकजे, आसनगावचे सरपंच रविना कचरे, उपसरपंच राहुल चंदे, भास्कर जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी पोषण आहाराची टोपली देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. महिला बचत गटाच्या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. सुषमा स्वराज पुरस्काराचे वितरण यावेळी झाले. तसेच बचत गटांना निधी वितरण करण्यात आले. उमेदतर्फे बचतगटाना फिरता निधी वाटप करण्यात आले.

श्री गिरीराज सिंह म्हणाले की, देशात ८६ हजार महिला बचतगट आहेत. यात सुमारे ९ कोटी महिलांचा समावेश आहे. गेल्या आठ वर्षात केंद्र शासनाने या महिलांना सुमारे 6 लाख 26 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बचतगटाच्या महिलांना सक्षम करून बचतगटातील प्रत्येक भगिनीला लखपती करावे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी  लखपती दीदी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या मासिक उत्पन्नात वाढ होईल व जिल्ह्याचा जीडीपी वाढेल. यासाठी महिला बचत गटांना शिलाई मशीन, पॅकेजिंग मशीन, गाई/म्हशी, कोंबडी पालनासाठी मदत करण्यात यावे. तसेच आज ड्रोनचा जमाना असून याच्या माध्यमातून शेती करू इच्छिणाऱ्या महिलांना जिल्हाधिकारी यांनी कर्ज मिळविण्यासाठी सहकार्य करावे. तसेच भाजीपाला पिकविणाऱ्यासाठी शितगृहाची उभारणी करावी.

महिला बचतगटाच्या उत्पादनांना बाजार मिळण्यासाठी फ्लिपकार्ट, अमेझॉन, जेम पोर्टल व सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून नियोजन करावे. ज्यावेळी या देशातील महिला आर्थिक सक्षम होतील त्यावेळी आपला भारत जगात पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावरची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास श्री गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे व भिवंडीतील शासकीय रुग्णालयातील कॅन्टीनचे काम महिला बचतगटाना द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बचतगटाच्या ठाण्याचा वज्रेश्वरी ब्रँड जागतिक पातळीवर नेण्याचे काम करावे : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक भारत श्रेष्ठ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बचतगटाच्या महिलांनी योगदान द्यावे. उमेद अभियानामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. चूल आणि मूल एवढेच काम न करता आजच्या महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. ठाणे जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांनी आपला वज्रेश्वरी हा ब्रँड जागतिक पातळीवर नेण्याचे काम करावे.

मुंबई व ठाण्यातील लोकसंख्येला लागणारा रोजचा दुधाचा पुरवठा आज बाहेरील जिल्ह्यातून होत आहे. ठाण्यातूनच हे दूध पुरविण्यासाठी उमेदच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत असून त्यासाठी ६४० महिलांना एकत्र आणून दुग्धव्यवसाय सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतमध्ये सोलर पॉवरचा उपयोग करण्यात येणार असून यासाठी लागणारे पॅनल महिला बचतगटांनी तयार केलेले असावे अशी इच्छा आहे. बचतगटाच्या महिलांनी दर्जेदार व चांगल्या प्रतीचे उत्पादन तयार करावे. त्याच्या विक्रीसाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू. बचत गटाच्या महिलांचा समूह गट तयार करून केळीचे उत्पादन घेण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जिंदल यांनी जिल्ह्यातील महिला बचतगटाच्या कामगिरीची माहिती दिली. श्री. जिंदल म्हणाले की, जिल्ह्यात सुमारे १ लाख महिलांचा समावेश असलेल्या १० हजार ८५४ बचत गट कार्यरत आहेत. आज या कार्यशाळेला जमलेल्या महिला या घरातून काम करणाऱ्या, छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या बचतगटाच्या भगिनी आहेत. जिल्ह्यातील महिला बचतगटांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. यामध्ये ९ कोटी ८० लाख फिरता निधी वाटप केले आहे. बँकेच्या माध्यमातून ४ कोटी २४ लाखाचे कर्ज वाटप केले आहे. मिलेटच्या ब्रँडिंगसाठी जिल्ह्यात मिलेट स्पर्धा व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. बचतगटाच्या महिलांच्या यशोगाथेतून इतर महिलांना प्रेरणा मिळत आहे.

यावेळी चारुशीला गायकर, दर्शना चौधरी या बचतगटाच्या भगिनींनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती शिसोदे यांनी आभार व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!