दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२१ | फलटण | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे दिलेला आहे. त्यांच्या सोबतच फलटण पंचायत समितीचे उपसभापती सौ. रेखा खरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांच्या पुढे सादर केलेला आहे. फलटण पंचायत समितीचे सभापती यांचा राजीनामा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यानंतर फलटण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचेच नाव चर्चेत आहे. आगामी काळामध्ये फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी कोण विराजमान होईल ? याच्याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर लगेचच त्यांनी फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिलेला आहे. आगामी काही दिवसांमध्ये त्यांचा राजीनामा मंजूर होईल. त्यानंतर सभापती व उपसभापती पदासाठी नक्की कोणाला संधी मिळेल याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
फलटण तालुक्यातील युवकांच्यामध्ये मोठा जनसंपर्क असणारे श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांना सभापती पदासाठी संधी मिळणार का ? श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांचे नाव सध्या तरी फलटण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाची माळ श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या गळ्यामध्ये पडणार का ? याच्याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
फलटण पंचायत समितीच्या उपसभापती सौ. रेखा खरात यांनी राजीनामा दिल्याने उपसभापती पद रिक्त झालेले आहे. तरी उपसभापती पदी संजय कापसे, संजय सोडमिसे व बाळासाहेब ठोंबरे यांच्या नावाची चर्चा सध्या पंचायत समितीच्या वर्तुळात सुरू आहे तरी आगामी काळामध्ये पंचायत समितीचे उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याने आपण फलटण पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा दिला असून इतर पंचायत समिती सदस्यांना सुद्धा सभापती व उपसभापती काम करण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुढील भूमिका लवकरच जाहीर करतील, अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक व पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी दिली.
आगामी काळामध्ये आमचे नेते व विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम असेल. फलटण तालुक्यामधील सर्वसामान्य नागरिकांची कामे झाली पाहिजेत, त्यासाठीच आम्ही सर्व जण कायम कार्यरत राहणार आहोत. तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व जण कार्यरत आहोत. आगामी काळामध्ये सुद्धा आम्ही कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया युवा नेते व पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.