दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२४ | फलटण |
कोळकी ग्रामपंचायतीने (ता. फलटण, जि. सातारा) गावातील नक्षत्र अपार्टमेंट सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून सोसायटीच्या जागेत अतिक्रमण करण्यासाठी व सोसायटीमधील ९६ सदनिकाधारकांना त्रास होईल या द़ृष्टीकोनातून सांडपाण्याची सिमेंट पाईप आणून टाकलेली आहे, असा तीव्र आरोप करून त्याबाबत प्रशासनाने हे काम थांबविण्यासाठी या सोसायटीमधील रहिवाशांनी राज्यपालांसह, जिल्हाधिकारी, फलटणचे उपविभागीय अधिकारी व इतर अधिकार्यांकडे अर्ज केला आहे.
याबाबत माहिती अशी, कोळकी (ता. फलटण) येथील नक्षत्र अपार्टमेंट सोसायटी एकूण ९६ सदनिका आहेत. ग्रामपंचायतीने सोसायटीच्या उत्तर बाजूच्या संरक्षित भिंतीला लागून आतील बाजूस सांडपाण्यासाठी पाईपलाईन करण्यासाठी सोसायटीच्या जागेत लहान आकाराच्या सिमेंट पाईप आणून टाकलेल्या आहेत. ही जागा ही सोसायटीच्या मालकी वहिवाटीची असून ग्रामपंचायतीने कोणत्याही कायदेशीर मार्गांची पूर्तता न करता अगर सोसायटीस कोणतीही नोटीस न पाठविता सदनिकाधाराकांवर अन्याय केला आहे. या पाईप सांडपाण्यासाठी पाईपलाईन करण्यासाठी टाकलेल्या आहेत, ग्रामपंचायतीने असे सांगितले व सदरची पाईपलाईन ही शारदा नगर येथील रहिवाशी, विविध हॉटेल्स् यांना जोडणारी असून त्यामुळे आम्हा सर्व सोसायटीच्या सदनिकाधारकांना त्याचा त्रास होणार आहे. कारण सर्व हॉटेलमधील सांडपाणी या पाईपलाईनव्दारे गेल्यास चेंबरमधून सांडपाणी हे आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये गार्डनमध्ये साचणार आहे व सदरची जागा ही सोसायटीच्या मालकी वहिवाटीची असून तेथून सदरची सांडपाण्याची पाईपलाईन नेण्यास व त्यासाठी खोदकाम करण्यास आमच्या सर्व सोसायटीमधील सदनिकाधरकांचा विरोध आहे. खोदकाम करताना आमची उत्तरेकडील संरक्षित भिंतीला धोका निर्माण झाला असून व सोसायटीच्या उत्तरेकडील संरक्षित भिंतीला लागून सोसायटी मालकीच्या पूर्व-पश्चिम अशी मोठमोठी झाडे असून त्या झाडांनाही धोका निर्माण होणार आहे.
गार्डनला लागून सोसायटीच्या पिण्याच्या व सांडपाण्याच्या जमिनीमध्ये मोठमोठ्या टाक्या आहेत. त्याला धोका निर्माण होऊन त्यातील पाणी प्रदूषित होण्याचा संभव आहे व त्यामुळे सोसायटीमधील सदनिकाधारकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सदरचे सांडपाण्यासाठी खोदकाम करू नये, असे आदेश संबंधित अधिकार्यांना देण्यात यावेत तसेच या पाईपलाईनमुळे सर्व सदनिकाधारकांच्या व त्यांच्या लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने ही सांडपाण्याची पाईपलाईन करू नये, असे संबंधित अधिकार्यांंना आदेश व्हावेत, अशी मागणी सोसायटीमधील सर्व सदनिकाधारकांनी प्रशासनाकडे केली आहे. यावर कार्यवाही झाली नाही तर सर्व कुटुंबासह प्राणांतिक उपोषणास आम्ही बसू, असा इशारा सदनिकाधारकांनी दिला आहे.
नक्षत्र अपार्टमेंट सोसायटीने स्वःखर्चाने सांडपाण्याची पाईपलाईन व्यवस्थितरित्या केलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सांडपाण्याच्या पाईपलाईन आम्हा सर्व नक्षत्र अपार्टमेंट सोसायटीधारकांचा ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनला तीव्र विरोध आहे, असेही सदनिकाधारकांनी अर्जात म्हटले आहे.