
स्थैर्य, फलटण, दि. २५: कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांसह सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी १० % बेड राखीव ठेवावेत आणि औषधोपचारासाठी येणारा संपूर्ण खर्च नगर पसरिषदेने करावा अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण शहर शाखेच्यावतीने निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सहाय्यक मुख्याधिकारी महात यांच्याकडे संघटनेच्या सदर निवेदन देण्यात आले त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोज मारुडा, कार्याध्यक्ष आनंद डांगे, उपाध्यक्ष रमेश वाघेला, सचिव नितीन वाळा, खजिनदार हिरालाल वाळा यांच्यासह अन्य पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
कोरोना १९ संसर्गजन्य आजाराची दुसरी लाट फलटण शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत तीव्रतेने पसरत असताना बाधीत रुग्ण व मृतांच्या संख्येत होणारी वाढ मोठ्या प्रमाणावर असल्याने नगर परिषदेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाचा मुकाबला करुन नागरिकांना आरोग्य सेवा सुविधा देताना स्वतःचा जीव धोक्यात घालुन काम करावे लागत असून त्यामध्ये संदेश चव्हाण या आमच्या कोरोना योद्याचे कोरोना बाधा झाल्याने दुर्दैवी निधन झाले आहे.
कोरोना वाढत्या संसर्गाचा कालावधीत अहोरात्र काम करताना या अधिकारी/कर्मचाऱ्यांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी त्यांचे साठी मागणी प्रमाणे १० % बेडस राखीव ठेवावेत आणि त्यांच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च नगर पालिकेने करावा अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रति श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी सातारा, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, आरोग्य समिती सभापती सनी अहिवळे, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मारुडा, सातारा जिल्हाध्यक्ष सूरज सोळंकी, उपाध्यक्ष राजू मारुडा वगैरेंना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.