दैनिक स्थैर्य | दि. १० एप्रिल २०२३ | फलटण |
राजाळे, ता. फलटण गावच्या हद्दीत आज पहाटे ४.०० वाजता पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तलीच्या इराद्याने चारचाकी पिकअपमध्ये जिवंत तीन जर्सी गाई घेऊन जाताना आढळल्या. यावेळी आरोपींनी या गाईंना विना चारापाणी, दाटीवाटीने पिकअपमध्ये भरले होते. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी तिघांवर प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याची फिर्याद पो.कॉ. सुरेश गंगाराम चौरे यांनी दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी ख्वाजा अब्बास शेख (वय २५), रफिक मकबूल शेख (वय २२) व सोहेल चांद शेख (वय २०, सर्व राहणार सरडे, तालुका फलटण, जि. सातारा) या तिघाजणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे ५ लाख रुपये किमतीची पांढर्या रंगाची चारचाकी पिकअप (क्र. एमएच ४२ एम ४१६४), सुमारे १.५० लाख रुपये किमतीच्या तीन जर्सी गाई अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाच्या असा एकूण ६.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, राजाळे, ता. फलटण गावच्या हद्दीत आज पहाटे ४.०० वाजता राजाळे ते पिंप्रद जाणारे रोडवर जानुबाई मंदिराजवळ एक पांढरे रंगाचा चारचाकी पिकअप (क्र. एमएच ४२ एम ४१६४) वरील चालक ख्वाजा अब्बास शेख व त्याचेसोबत असलेले दोन इसम रफिक मकबूल शेख व सोहेल चांद शेख (सर्व राहणार सरडे) यांनी मिळून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता तीन जर्सी गाई जिवंत अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाच्या यांना चारापाण्याची सोय न करता कत्तल करण्याचे इराद्याने कमी जागेमध्ये निर्दयपणे दाटीवाटीने भरून घेऊन जात असताना मिळून आले आहेत.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी वरील तिघा आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ करत आहेत.