दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गोरक्षकाने दिलेल्या माहितीवरून कारवाई करत तीन दोन ते अडीच वर्षांच्या काळ्या-पांढर्या रंगाच्या जर्शी गाई मालवाहतूक गाडी कत्तलीसाठी दाटीवाटीने भरून चारापाण्याची सोय न करता बेकायदेशीरपणे घेऊन जाताना पकडून त्यांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी अशोक लेलँड कंपनीच्या मालवाहतूक गाडी (क्र. एमएच-४५-एफ-९०६९) सह एकूण ५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसात दोघांविरोधात प्राण्यांच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडीचालक समाधान नाना थोरात (वय ४०, रा. अकोले बु., ता. माढा, जि. सोलापूर) व सागर कबीर खंडागळे (वय २९, रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो.ह. चांगण करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी जनावरांचा व्यापार करणार्या सर्वांना आवाहन केले आहे की, कोणीही गोवंश जनावरे कत्तलीसाठी खरेदी करू नये व त्यांची विक्री करू नये, नाहीतर त्यांच्या कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.