दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2023 | फलटण | कझगिस्तान येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. महेश शिंदे यांनी आयर्न मॅन हा बहुमान मिळविल्याबद्दल मराठा समाज विकास संस्थेच्यावतीने डॉ. माधव पोळ यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
३.८ कि.मी. पोहणे, १८० कि.मी. सायकल चालविणे आणि ४२.२ कि.मी. धावणे हे सलग १७ तासात पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना हा बहुमान प्राप्त होणार होता डॉ. महेश शिंदे यांनी ही संपूर्ण प्रक्रिया केवळ १४ तास २६ मिनिटात पूर्ण करुन हा बहुमान प्राप्त केला आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपण सुमारे ६ महिने आठवड्यातून एक दिवस एकावेळी ८० कि. मी. सायकल चालविणे तसेच प्रदीर्घ काळ पर्यंत पोहण्याचा तसेच नियमीत चालण्याचा सराव केल्याने आपण या स्पर्धेत यशस्वी झाल्याचे डॉ. महेश शिंदे यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजयाबद्दल शहरातील डॉक्टर्स, मित्र मंडळी यांच्यासह फलटणकरांनी आपले कौतुक करुन सत्कार केल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
मराठा समाज विकास संस्थेच्यावतीने डॉ. शिंदे यांचे वडील निवृत्त प्राथमिक शिक्षक हरिभाऊ शिंदे व मातोश्री सौ. भारती शिंदे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
मराठा समाज विकास संस्थेचे सचिव निवृत्त प्रा. सूर्यकांत निंबाळकर यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात डॉ. महेश शिंदे यांचा परिचय करुन देत स्पर्धेतील त्यांचा विजय हा सतत केलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे सांगून डॉ. महेश शिंदे यांचे अभिनंदन केले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना इयत्ता ५ वी मध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि शैक्षणिक गुणवत्तेत मागे असल्याने शिक्षकांनी केलेल्या अपमानाचा राग मनात धरुन आपण तालीम सुरु केली आणि शरीर प्रकृती सुधारत असताना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नातून टप्प्याटप्प्याने दोन्ही मध्ये चांगली सुधारणा होत गेली आणि एम.बी.बी.एस. प्रवेश शासकीय महाविद्यालय मिरज येथे गुणवत्तेवर मिळाल्याचे अभिमानाने सांगत प्रयत्नाने सुधारणा करता येत असल्याचे डॉ. महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.