
सातारा शहरातील माची पेठेतील श्री ढोल्या गणपती.
स्थैर्य, 16 मार्च, सातारा : सातारा नगरीचे ग्रामदैवत श्री ढोल्या गणपती मंदिराच्या जिर्णोध्दाराचा प्रारंभ गुढीपाडवा दिवशी गुरुवार दि. १९ रोजी स. १० वा ३० मिनिटांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले, श्रीमंत सौ. वृषालीराजे भोसले, श्रीमंत सत्वशीलाराजे अक्षोभसिंह सिंग तसेच सातारचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगर सेवक यांचे उपस्थितीत होणार आहे. मंदिर जीर्णोध्दारास राजघराण्याचे सहकार्य आहे. तसेच सातारा शहरातील सर्व गणेश भक्तांनी जीर्णोध्दाराला सहकार्य करावे अशी विश्वस्तांची विनंती आहे.अशी माहिती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त एडवोकेट राजीव सबनीस यांनी दिली
श्री ढोल्या गणपती हे साताराचे ग्रामदैवत आहे. सातारावासीय कोणताही धार्मिक कार्यक्रम, मुंज, लग्न, वास्तुशांत इ. करणेपूर्वी पहिली अक्षद या गणपतीस देऊन मंगल कार्यारंभ करतात ही गणरायाची मूर्ती स्वयंभू स्वरूपातील उजव्या सोंडेची व नैऋत्य दिशेस पाहणारी आहे. या गणपतीचे कंबरेस नागाचा विळखा असून त्यास ‘नागचाप विनायक’ असेही म्हणतात. हा गणपती नवसाला पावणारा आहे. हे मंदिर अदालत वाड्याजवळ आहे. मंदिर दगड वीट व पत्र्याचे छप्पर अशा स्वरूपातील बांधकामात आहे. मंदिर परिसर शांत व अल्हाददायक, मन प्रसन्न करणारा आहे. या गणपतीचे मूर्तीचा इतिहास १२ व्या शतकात म्हणजे भोज राजाने ज्यावेळी मंगळाई (अजिंक्यतारा) किल्ला बांधला त्या काळातील आहे.
श्री शिव छत्रपती काळात त्यास मंगळाई डोंगर / किल्ला अशा नोंदी आहेत. धर्मवीर छ. संभाजीराजे यांचे बलिदाना नंतर औरंगजेबाचा मुलगा अजीम याने किल्ल्यास ६ महिने वेढा घातला होत. त्यास किल्ला जिंकता आला नाही परंतु नंतर त्यांचे ताब्यात किल्ला गेल्यावर त्याने किल्ल्यास ‘अजीमतारा’ हे नाव ठेवले होते. पुढे मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला ताब्यात घेतला व त्यास सध्याचे ‘अजिंक्यतारा’ हे नाव ठेवले. या अजिंक्यतारा पायथ्याशी अदालत वाड्याच्याजवळ हा प्रंचड शिळेत कोरलेला गणपती आहे. आकाराने मोठा व पूर्वी शेंदूराचे थर असलेने तो ढोल्या गणपती म्हणून प्रचलीत झाला.या ढोल्या गणपतीचा जीर्णोध्दार विश्वस्तांनी व सातारवासियांनी करणेचे ठरविले आहे. प्लॅन, एस्टिमेट, काढलेले आहे. मंदिर पूर्ण झालेवर अत्यंत देखणे होणार आहे.
या जिर्णोद्धारासाठीदेणगी संपर्क- गोडबोले सुगंधी, Mo. 8484891671 तांदुळ आळी, सातारा. येथे करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

