
स्थैर्य, 1 मार्च, सातारा : खड्यांमुळे दीर्घकाळापासून विद्रूप झालेल्या, प्रवासी आणि एसटी बसचालकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या कोयनानगर येथील बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळ रखडलेले हे काम, आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
कोयनानगर हे कोयना धरण परिसरातील महत्त्वाचे वाहतूककेंद्र असून, येथील बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, बसस्थानक परिसरातील रस्ता पूर्णपणे उखडून मोठमोठे खड्डे पडले होते. तेथे पावसाळ्यात चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता, तर उन्हाळ्यात धुळीमुळे परिस्थिती बिकट होतजुना खराब झालेला भाग काढणे, पृष्ठभाग समतल करणे आणि काँक्रीट टाकण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीची कामे सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून बसस्थानकाचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सध्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्याकोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अभियंता महेश रासनकर व उपअभियंता किरण कानुगडे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू असून, दर्जेदार आणि टिकाऊ कामावर संबंधित अधिकारी भर देत आहेत. या काँक्रिटीकरणामुळे बसस्थानक अधिक मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे होणार आहे.
या कामामुळे कोयनानगर बसस्थानकाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, कोयनानगरला आधुनिक स्वरूप येण्यास मदत होणार आहे. या कामामुळे कोयनानगरला आधुनिक ’लूक’ मिळेल, असा विश्वास कोयनानगरवासीयांनी व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

