पाइप लाईनची गळती युद्धपातळीवर काढा : सौ. माधवी कदम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०३: सध्या सातारा शहरात कडक लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश सातारकर घरीच बसून आहेत, अशावेळी त्यांना पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावू नये, यासाठी पाइपलाईनलाची गळती युद्धपातळीवर काढा, अशा सूचना नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी आज दिल्या.

रविवारी शहापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून वितरण होणार्‍या पाइपलाइनला बोगदा परिसरात गळती लागली होती. त्यामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश परिसराला सकाळच्या सत्रातील पिण्याचे पाणी मिळाले नव्हते, या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी आज गळती काढण्याच्या कामाची पाहणी करून कर्मचार्‍यांना विविध सूचना केल्या.

सौ. माधवी कदम पुढे म्हणाल्या, पाइपलाइनला गळती लागल्यामुळे मंगळवारी सकाळी शहरातील बहुतांश भागाला पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. सध्या अद्यापही कडक उन्हाळा आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सातारा शहरात लॉकडाउन करण्यात आला आहे. या गोष्टींचा सारासार विचार करून कर्मचार्‍यांनी बोगदा परिसरातील पाइप लाइनला लागलेली गळती करण्याचे काम युद्ध पातळीवर करून सातारकरांना दिलासा द्यावा. एकीकडे गळती काढण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जकातवाडी येथील फिल्टरेशन प्लांटमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतल्याने या कामासाठी भविष्यात पाणीपुरवठा बंद करावा लागणार नाही, पाणी पुरवठा विभागाने ही सजगता दाखवून सातारा नगरपालिका नागरिकांसाठी बांधील असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

सौ. कदम पुढे म्हणाल्या, मान्सून महाराष्ट्राच्या दारात येऊन दाखल झाला आहे. नजीकच्या काळात मान्सून सातारपर्यंत येईल. अशावेळी सातारकर नागरिकांना स्वच्छ व पिण्याचे पाणी मुबलक कसे मिळेल यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी उकळून गार करून प्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!