स्थैर्य, वाई (जि. सातारा), दि.२३ : शहरातील रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पालिकेच्या अतिक्रमण पथकाने हाती घेतली. या वेळी भाजी मंडईतील विक्रेत्यांना मागे हटविण्यात आले. मंडई व अन्य भागातील काही अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली.
लॉकडाउन काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकृत व्यवसायाची ठिकाणे बंद होती. भाजी मंडई आणि इतर ठिकाणचे अधिकृत व्यवसाय बंद होते. त्या वेळी भाजी व फळ विक्रेते यांना नगरपालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत विभागून बसण्याची परवानगी देण्यात आली होती. तथापि, या काळात त्यासोबत इतरही अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी शहरभर रस्त्यावर आपले व्यवसाय सुरू केले होते. शहरातील व्यवहार सुरळीत झाल्यानंतर भाजी मार्केट, दुकाने नियमित चालू झाल्यापासून अशाप्रकारे अनधिकृतरीत्या रस्त्यावर बसणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेच्या वतीने वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, रस्त्यावरील व्यावसायिकांची वाढती संख्या, तसेच वाहतूक आणि दैनंदिन रहदारीमुळे होणारा अडथळा लक्षात घेता पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अशा व्यावसायिकांवर कडक मोहीम सुरू केली आहे. अनेक ठिकाणी अधिकृत गाळे असणाऱ्या गाळे धारकांनीही रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करण्यास सुरवात केली होती. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अशा सर्व विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात आली. अतिक्रमण विभागामार्फत ही कार्यवाही यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी सांगितले. अतिक्रमण पथक प्रमुख, कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, बांधकाम विभागप्रमुख भेंडे यांच्या संयुक्त पथकाने ही कार्यवाही केली. या पथकामध्ये आरोग्य विभागाचे मुकादम राहूल गाडे, रवींद्र काळोखे, उमेश कांबळे, बांधकाम विभाग कर्मचारी निनाद जगताप, जितेंद्र वंजारी, नितीन टापरे, कुंडलिक लाख्खे, रोहित गाढवे आदींनी सहभाग घेतला. शहरात अनधिकृतरीत्या वाहनांचे होत असलेल्या पार्किंगवरही वाहतूक शाखेमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.