दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । सातारा । शासनाच्या विविध योजना राबविण्यात सातारा जिल्हा परिषद देशासह राज्यात आघाडीवर राहिली आहे. याची दखल नेहमीच केंद्र व राज्य शासनाने घेऊन अनेक पुरस्कार देवून सातारा जिल्हा परिषदचा गौरवही केला आहे. गेल्या दोन वर्षात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषदेने प्रभावीपणे राविलेल्या योजनांची माहिती देण्यात येत आहेत.
महाआवास अभियान-ग्रामीण 2021-22 मध्ये सातारा जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत तृतीय व राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला असून सातारा जिल्ह्यास विभागस्तरावर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
देशपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना केंद्र शासनामार्फत देण्यात येणारा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियानामध्ये सन 2020-21 मध्ये सातारा जिल्हा परिषद सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
शालेय परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्स कार्यक्षमता सोयीसुविधा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता यांचा विचार करुन जाहीर करण्यात येणाऱ्या कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात सातारा जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजना, उपक्रम विशेषत: स्वच्छता, बचत गट, ग्रामीण आवास योजना इत्यादीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 75 पंचायती राज संस्थांची निवड केली आहे त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचा समावेश आहे. कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत सातारा जिल्हा परिषदेने पशुधन संदर्भात दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे शंभर टक्के पेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केल्याने सातारा जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळविलेला आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प मौजे कोळकी ता. फलटण येथे जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यास राज्य शासने मान्यता दिली आहे. राज्यातील पहिला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प मौजे मसूर ता. कराड येथे जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत 55 लिटर दरडोई प्रमाणे प्रत्येक घराला वर्षभर शाश्वत पाणी व शुद्ध पाणी पुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये 83 टक्के नळ जोडणी पूर्ण केली असून जिल्ह्यातील 3 हजार 541 शाळा व 4 हजार 611 अंगणवाड्यांना 100 टक्के नळ कनेक्शन पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे नळ योजना 791 कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आलेली असून या कामांसाठी 28.53 कोटी निधी खर्च करण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात 96 हजार 927 उद्दिष्टापैकी 99 हजार 51 साध्य करुन 102.19 टक्के काम पूर्ण करण्यात आहे. मार्च 2022 अखेर या योजनेंतर्गत 4208 लक्ष अनुदान संबंधित गरोदर मातांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत जिल्ह्यामध्ये पोषण अभियानात सर्वाधिक उपक्रम राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. याबद्दल 8 मार्च 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांच्याहस्ते जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्हा कार्यक्रम अधिकारी रोहिणी ढवळे यांचा मुंबई येथे सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.