स्थैर्य, मुंबई, दि.३१: देशातील सर्वाधिक बाजारमुल्य असेलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दुस-या तिमाहीतील निकाल घोषित केले आहेत. कंपनीला सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये एकूण 9567 कोटींचा फायदा झाला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा फायदा 15 टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी दुस-या तिमाहीत 11262 कोटींचा फायदा झाला होता. महत्वाचे म्हणजे कोरोना काळात रिलायन्सला परदेशातून कोट्यवधींची गुंतवणूक मिळाली आहे.
देशभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असूनही कंपनीला जूनच्या तिमाहीत 8380 कोटींचा नफा झाला होता. वार्षिक आकडेवारीनुसार कंपनीला शुद्ध नफ्यामध्ये 15 टक्क्यांची घट सहन करावी लागली आहे. कंपनीचे उत्पन्ना 2020-20 च्या दुस-या तिमाहीमध्ये घटून 1.2 लाख कोटी रुपये झाले. जे वर्षभरापूर्वी 2019-20 मध्ये याच तिमाहीत 1.56 कोटी एवढे होते.
गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओचा शुद्ध नफा या आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत तिपटीने वाढला आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला लाभ 2844 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 990 कोटी रुपयांचा लाभ झाला होता. तिमाहीच्या आधारे ही वाढ 12.85 टक्के एवढी आहे. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीला 2520 कोटींचा निव्वळ नफा झाला होता.