
स्थैर्य,कोयनानगर, दि. २७ : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या मळे, कोळणे,पाथरपुंज या गावांतील बाधित जनतेने आदर्श पुनर्वसनासाठी कालपासून आंदोलन सुरू केले.
मळे, कोळणे, पाथरपुंज या चांदोली अभयारण्यांतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या तीन गावांच्या रेंगाळलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात शासनाचा वेळकाढूपणा व दिरंगाईचा जाहीर निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी कालपासून कोळणे येथील संरक्षक भिंतीजवळ आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे. चांदोली अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात मळे ,कोळणे, पाथरपुंज ही गावे 35 वर्षांपासून जीवन जगत आहेत. वन्यप्राण्यांना अधिकार व स्वातंत्र्य देवून जनतेचे अधिकार गोठवण्याचे काम शासनाने केले आहे. तीन गावांतील जनतेने आपल्या पुनर्वसनासाठी इतर ठिकाणी जागा पसंद केल्या आहेत. तेथील जमिनीचे क्षेत्र कमी असल्याने सरसकट पुनर्वसन होऊ शकत नाही. या आंदोलनाला श्रमिक मुक्ती दलाने जाहीर पाठिंबा देऊन या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. यावेळी मुक्ती दलाचे बळीराम कदम, महेश शेलार, सचिन कदम, सीताराम कदम, रामचंद्र कदम उपस्थित होते.
तीन गावांतील जनतेने आमचे आदर्श पुनर्वसन करा, यासाठीच 15 वर्षे प्रशासनाला सहकार्य केले आहे. देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आमच्या भूमीत होत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटत असला तरी बाधितांना प्रशासनाने योग्य तो न्याय दिला पाहिजे.
-संजय कांबळे, समन्वयक, कृती समिती
-संजय कांबळे, समन्वयक, कृती समिती
अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाबाबत दिरंगाई, वेळकाढूपणाचा निषेध करण्यासाठी या तीन गावांतील जनतेने आंदोलनाची ठिणगी टाकली आहे. दोनच दिवसांत या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर या ठिणगीचे रुपांतर वणव्यात होईल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.
-संजय पवार, अध्यक्ष, कृती समिती
-संजय पवार, अध्यक्ष, कृती समिती