
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : राज्यभरातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळा’ची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) सुरू झाली आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी नुकतेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या सदस्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रफुल्ल दिलीप संकुडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. या कल्याणकारी मंडळाद्वारे रिक्षाचालकांना मिळणाऱ्या लाभांविषयी त्यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने ६५ वर्षांवरील चालकांसाठी सन्मान निधी, जीवन विमा व अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कामगार कौशल्यवृद्धी, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि नवीन रिक्षा किंवा घर खरेदीसाठी कर्ज योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक विशाल वसंत पाटील यांच्यासह आरटीओ कार्यालयातील कर्मचारी आणि रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी कागदपत्रे पूर्ण असणाऱ्या अनेक रिक्षाचालकांचे नोंदणी अर्ज स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाइन भरून देत त्यांना प्रत्यक्ष मदत केली. फलटण तालुक्यातील सर्व रिक्षाचालकांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रफुल्ल संकुडे यांनी केले.