स्थैर्य, सातारा, दि. 08 : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. छोट्या मोठ्या उद्योग आणि कंपन्यांचीही अर्थव्यवस्था कोलमडली असून औद्योगिक क्षेत्राला पुन्हा उभारी मिळण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांसह पुणे, मुंबईवरून आलेल्या कुशल बेरोजगारांना पुन्हा रोजगार मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्यातून स्थानिक भूमिपुत्र आणि पुणे, मुंबईवरून नोकरी सोडून आलेल्यांसाठी सातारा एमआयडीसीमध्ये रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरु केलेल्या हेल्पलाईनला मोठा प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात तब्ब्ल ७०० इच्छुकांची नोंदणी झाली आहे.
कोरोना महामारीमुळे परप्रांतीय कामगार आणि मजूर हे त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यांच्या जाण्यामुळे सातारा एमआयडीसीतील सर्व कंपन्यांमध्ये विविध विभागातील हजारो पदे रिक्त झाली आहेत. उद्योजक कंपन्या, उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत परंतु औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांमध्ये इंजिनियर, अकॉउंटन्ट, फिटर, वेल्डर, हेल्पर यासह सर्वच पदाच्या कामगार-कर्मचारी यांची कमतरता भासू लागली आहे. ही समस्या सोडवण्यासंदर्भात एमआयडीसीतील मास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांची बैठक झाली होती. उद्योजकांपुढील समस्या सोडवण्यासाठी तसेच उद्योजकांना युनियन, ठेकेदारी असा कोणताही त्रास न होता आणि सातारा- जावली मतदारसंघातील बेरोजगारांनाही एजंटगिरी न होता विनाशुल्क, मोफत रोजगार मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतः हेल्पलाईन सुरु केली आहे.
दोन दिवसांपासून सुरु झालेल्या या हेल्पलाइनवर आजच्या दिवसापर्यंत तब्ब्ल ७०० नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, नोंदणी झालेल्या उमेदवारांची माहिती तात्काळ मास संस्थेला ईमेलद्वारे पाठवली जात असून सातारा एमआयडीसीमधील विविध कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार आणि उमेदवारांच्या कौशल्यानुसार संबंधित कंपनी व्यवस्थापन आवश्यक त्या उमेदवारांना नोकरीची संधी देणार आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून संबंधित उमेदवाराला कळवले जाणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील दूरध्वनी क्र. ०२१६२-२८२२३४ आणि ०२१६२- २८३२३४ यावर संपर्क साधणाऱ्या इच्छुक गरजू उमेदवारांची नावनोंदणी सुरु आहे. कार्यालयीन वेळेत इच्छुकांनी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.