स्थैर्य, सातारा, दि.९ : कोरोना रुग्णांवर उपचार व संशयित रुग्णांना आयसोलेशनसाठी सुरू करण्यात आलेली 14 कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहेत. या कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली होती. काही कोविड सेंटर बंद करण्यात आल्याने 99 कर्मचाऱ्यांची कपात केली असून, 130 कर्मचाऱ्यांना कार्यरत ठेवण्यात आले आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्यामुळे सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांना जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने बाधित रुग्णांसाठी जिल्हाभरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. मात्र, सद्यःस्थितीत हळूहळू रुग्णांची संख्या नियंत्रित होत असल्याने काही सेंटर बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढताना कोविड सेंटरमध्ये शासनाने तात्पुरत्या स्वरूपात 229 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.