दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । मुंबई । राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती,नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे,अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना श्री. टोपे बोलत होते.त्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागा भरती प्रक्रिया सुरू आहे.शंभर टक्के रिक्त जागा भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ञांच्या ८३३५ जागांपैकी ७९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. ३३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी २६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.
२४ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये खासगी सार्वजनिक भागिदारी तत्वावर चालवण्याबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र प्रत्येक जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.नवीन शासकीय रुग्णालय मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सामंजस्य करार करण्यात येत आहेत, असे श्री.टोपे यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा विकास कामांसाठी आशिया विकास बँककडून ५१७७ कोटी रुपये तर हुडको कडून ३९९४ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. यातून श्रेणीवर्धन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे खरेदी, मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे श्री. टोपे यांनी सांगितले.
राज्यातील जुन्या आणि दुरुस्ती न होणाऱ्या रुग्णवाहिकांऐवजी नवीन एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. वित्त आयोग निधी, खासदार निधी, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातूनही रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या लक्षवेधीच्या चर्चेत सर्वश्री प्रविण दरेकर, डॉ.रणजित पाटील, गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.