वाचनाने सकस विचार करून सकस साहित्य निर्माण केले पाहिजे – रवींद्र बेडकिहाळ


दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
साहित्यातून सामाजिक सलोखा जपून नवसाहित्यिकांनी नवी ऊर्जा घेतली पाहिजे. नव्या व जुन्या साहित्यिकांनी आपले साहित्य दर्जेदार निर्माण होण्यासाठी अधिक वाचन करणे आवश्यक आहे. वाचनाने मनावर संस्कार होऊन सकस विचाराने सकस साहित्य निर्माण झाले पाहिजे. युवा स्पंदन साहित्य संमेलनातून युवकांनी दिशा घ्यावी, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर सभागृह मार्केट कमिटी येथे माणगंगा साहित्य परिषद पांगरी, साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण व मॉडर्न इन्स्टिटयूट ऑफ मांडवे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय चौथ्या युवा स्पंदन साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रदीप कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, स्वागताध्यक्ष ताराचंद्र आवळे, माजी संमेलनाध्यक्ष विकास शिंदे, मार्केट कमिटी सचिव शंकरराव सोनवलकर, पत्रकार विजय भिसे, दत्तात्रय खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

रविंद्र बेडकिहाळ पुढे म्हणाले की, या संमेलनातून ज्येष्ठ व नव्या साहित्यिकांनी नवऊर्जा घेऊन युवा पिढीला दर्जेदार साहित्य द्यावे.
संमेलनाध्यक्ष प्रदीप कांबळे म्हणाले की, राज्यकर्त्यांनी प्रतिभावान व साहित्यिकांची बूज राखली पाहिजे. छोट्या छोट्या साहित्य संमेलनातून अस्सल साहित्यिक घडले जातील. साहित्यिक प्रतिभा जोपासण्याचे काम ज्येष्ठ साहित्यिकांनी केले तर युवा स्पंदन साहित्य संमेलन मार्गदर्शक ठरेल.

ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता म्हणाले की, साहित्यिकांनी सजग राहून आपले लिखाण करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला पाहिजे व युवा पिढीला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून संमेलनाची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा ठराव मांडला व तो बहुमताने मंजूर करण्यात आला. संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. यावेळी साहित्यिक ताराचंद्र आवळे लिखित वर्षा पतंगे यांचे चरित्र ‘एकाकी झुंज’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन व युवा कवी अविनाश चव्हाण यांच्या ‘प्रीतीचे दुःख’ या गीताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रकाशित पुस्तक यासाठी माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार देऊन निवडक साहित्य कृतीच्या साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व एक हजार रुपये किंमतीची पुस्तके भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. सुधीर बोकील व प्रा.अरुण घोडके यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी अविनाश चव्हाण यांना ‘युवा कवी’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बल्लाळ यांनी भारदस्त आवाजात केले तर आभार सचिव राजेश पाटोळे यांनी मानले.

दुसर्‍या सत्रात कथाकथनकार सौ. रंजना सानप यांनी काळजाला भिडणारी कोरोना स्थितीची ‘मुका प्राणी बैल व पारू’ ही कथा सादर करून रसिकांची वाहवा मिळवली व मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक कथालेखक सुरेश शिंदे यांनी कथेचा जन्म व त्याची उगमस्थाने यावर मार्गदर्शन करून कथालेखन याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर प्रा.सौ. सुरेखा आवळे, आबा आवळे, चैताली चव्हाण, महादेव गुंजवटे यांची उपस्थिती होती.

यानंतरच्या सत्रात खुले वसंतबहार काव्य मैफल यामध्ये जयकुमार खरात, विलास पिसाळ, प्रकाश सकुंडे, बाबासाहेब ढोबळे, अतुल चव्हाण, दत्तात्रय पांढरे, कचर शिंदे, आकाश आढाव, जयश्री माजगावकर, प्रमोद जगताप, परशुराम लडकत, बबन धुमाळ, अवधूत कोळी, संजय जाधव, मनीषा शीरटावले, हेमा जाधव, आनंदा ननावरे, गंगाराम कुचेकर, दलित गायकवाड आशा दळवी, अस्मिता दडस यांनी विविध ढंगातील कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. खुले वसंत बहार काव्य मैफल अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विलास वरे यांनी कविता वेदनेतून जन्म घेते व समाजातील वास्तवतेवर भाष्य करते. नवकवींनी लिहीत राहिले पाहिजे व ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे, असे विचार मांडले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी राहुल निकम यांनी बहारदार शब्दांच्या षटकाराने करून रंगत निर्माण केली. सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन कवींना गौरविण्यात आले.

समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव म्हणाले की, जे आपल्यासमोर घडते त्यावर भाष्य केले पाहिजे. संमेलनातून आपण सकारात्मक विचार घेऊन जाणार आहात व नव्या उमेदीने नवनवीन साहित्यकृती जन्माला घालणार आहात. त्यासाठी वाचनाची गोडी जपली पाहिजे व निकोप दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य शांताराम आवटे, स्वागताध्यक्ष ताराचंद्र आवळे, प्राचार्य चंद्रकांत ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संमेलन यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा.सौ सुरेखा आवळे, राहुल निकम, अविनाश चव्हाण, दत्तात्रय खरात, आबा आवळे, राजेश पाटोळे, चैताली चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

संमेलनासाठी साहित्यिक सौ. सुलेखा शिंदे, आकाश आढाव, प्रकाश पुरी, विक्रम आपटे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. सविता व्हटकर, सुभा लोंढे, डॉ बाळासाहेब शिंदे, प्रा. शिवाजी वरुडे, प्रा.नंदकुमार शेडगे, डॉ. मुक्ता अंभेरे, परशुराम लडकत, महादेव भोसले तसेच सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, ठाणे, नाशिक, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, अकोला, बुलढाणा या जिल्हयातील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बल्लाळ यांनी केले तर आभार स्वागताध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!