उपाध्यक्षपदी डॉ. एन. डी. पाटील, भाई गणपतराव देशमुख, जयश्रीताई चौगुले आणि आ. चेतन तुपे (हडपसर)
स्थैर्य, सातारा, दि. २८ : शैक्षणिक क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठय़ा असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड झाली तर उपाध्यक्षपदी डॉ. एन. डी. पाटील, भाई गणपतराव देशमुख, जयश्रीताई चौगुले आणि आमदार चेतन तुपे (हडपसर) यांची निवड झाली आहे. संस्थेच्या तीन वर्षाच्या सचिवपदासाठी प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
दरवर्षी 9 मे रोजी रयत शिक्षण संस्थेच्या सभासदांची बैठक सातारा येथे होत असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा सामाजिक अंतर ठेवत स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱयांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या.
संस्थेच्या सचिवपदी वाशी- नवी मुंबई येथील केबीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर यांची एकमताने निवड करण्यात आली. मुळचे सांगली जिह्यातील विसापूर गावचे आहेत. 1986 पासून रयत सेवक असलेले प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर हे कार्यरत आहेत. डॉ. शिवणकर यांनी कोरोनाच्या प्रार्दूभाव लक्षात घेवून रयत शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांचा सर्व्हे करुन ऑनलाईन शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचू शकते का याची माहिती गोळा केली आहे. डिजीटल, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचवण्याचा संस्थेचा प्रयत्न राहिल. मुल्यशिक्षण, पारंपारिक शिक्षणाला डिजीटल आणि ऑनलाईन शिक्षणाची जोड देत ते अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहिल. व्यवसायभिमूख डिजीटल, विज्ञानाची जोड देत रयतच्या शिक्षणाच्या कक्षा अधिक रुंदावण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे -पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, गणपराव देशमुख, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. अनिल पाटील, संजीव पाटील, मावळते सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.