
स्थैर्य, फलटण, दि. 13 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) धनादेश (चेक) वटवण्याच्या (Cheque Clearance) नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले असून, आता ग्राहकांना धनादेशाचे पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होणार आहेत. इतकेच नव्हे, तर ३ जानेवारी २०२६ पासून ही प्रक्रिया आणखी वेगवान होऊन, धनादेश जमा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पैसे उपलब्ध होणार आहेत.
आरबीआयने ‘जाणकार बना, सतर्क रहा!’ या मोहिमेअंतर्गत ही माहिती दिली आहे. नव्या नियमांनुसार, आतापासून बँका जमा झालेले धनादेश (चेक) त्याच दिवशी वटवतील किंवा काही त्रुटी असल्यास परत करतील. यामुळे ग्राहकांना पैशांसाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही.
या प्रक्रियेला अधिक गती देत, ३ जानेवारी २०२६ पासून बँका धनादेश सादर झाल्यानंतर तीन तासांच्या आत वटवणीची प्रक्रिया पूर्ण करतील, ज्यामुळे ग्राहकांना काही तासांतच क्रेडिट मिळेल.
ग्राहकांना काय फायदा?
या बदलामुळे ग्राहकांना पैशांची जलद उपलब्धता, अधिक चांगली बँकिंग सुविधा आणि कमी विलंब असे महत्त्वपूर्ण फायदे मिळणार आहेत. यासोबतच, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना धनादेश (चेक) बाउन्स होणे टाळण्यासाठी आपल्या खात्यात नेहमी पुरेशी शिल्लक ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी आपापल्या बँकेशी संपर्क साधावा, असेही आरबीआयने म्हटले आहे.