
दैनिक स्थैर्य । 13 मे 2025। सातारा । आग्रा (उत्तर प्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये येधील रयत जिमखान्याच्या प्रमोद पाटील यांनी 83 किलो वजनी गटात डेडलिफ्ट व बेंच प्रेस प्रकारात अनुक्रमे एक सुवर्ण व एक रजत, दर्शन देशमुख याने 74 किलो वजनी गटात एक रजत, अभिराज काळेने 105 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले, तर ऋतुजा पाटील व रुचिता पाटील यांनी सबज्युनिअरगटात अनुक्रमे 52 व 84 किलो वजनी गटात प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकावली.
पॉवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारातून रयत जिमखान्याच्या खेळाडूंनी सातार्याला 2022 पासून सलग चौथ्यांदा पाच सुवर्ण पदके मिळवून दिली आहेत. सातार्याला एका वेळी राष्ट्रीय स्तरावर पाच सुवर्णपदके पटकावून देणारी रयत जिमखाना ही सातारा जिल्ह्यातील एकमेव व्यायाम शाळा आहे. ऋतुजा पाटील ही दादासाहेब उंडाळकर विद्यालयाची, तर रुचिता पाटील ही विठामाता विद्यालय कहर्हाडची विद्यार्थिनो आहे. रयतच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये पाच सुवर्ण, दोन रजत व एका कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्राच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून कृत्तिका सोंडे यांनी काम पाहिले, तर विजेत्या खेळाडूंना आग्रा सिटीचे अतिरिक्त आयुक्त अजय सिंग, दुर्गेश राजुरीया, जीवन कुमार, सैदल सोंडे, इक्बालसिंग, सत्यनारायण यांच्या हस्ते पदक वितरण करण्यात आले.